मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना समजवावे…

भाजपा जिल्हाध्यक्षांचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांकडे साकडे..

⚡सिंधुदुर्गनगरी-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध वैयक्तिक प्रलोभने तसेच स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामांची आश्वासने देत चुकीच्या कार्यपद्धतीने त्यांचा पक्ष प्रवेश घेत आहेत.हे तात्काळ थांबावे या साठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी पत्राद्वारे साकडे घातले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रा प्रमाणेच भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे एकत्र युतीने लढविण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशही चांगले आले. मात्र या यशानंतर आता आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी याबाबतची नाराजी व्यक्त करत युतीतील या पदाधिकाऱ्यांना समजवा असे लेखी पत्र दिले आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष यांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना महायुती मधील मित्रपक्षाकडून पक्षप्रवेशासाठी प्रलोभने……..

आपल्या नेतृत्वाखाली महायुती सरकारची महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जाणारी दैदिप्यमान वाटचाल सुरु आहे. आम्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळत आपल्या पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. खरतर जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असताना युतीच्या धोरणाप्रमाणे जिल्ह्यातील दोन मतदार संघामध्ये युतीतील सेना या पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेत जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांना चांगल्या मतांनी विजयी केले. परंतु महायुतीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर संबंधित पक्षाच्या वरिष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांनी महायुती मधील समन्वय व्यवस्थित राखुन जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा योग्य तो आदर करणे अपेक्षित होते. परंतु कुडाळ- मालवण व सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच वरिष्ठ पदाधिकारी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध वैयक्तिक प्रलोभने तसेच स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामांची आश्वासने देत चुकीच्या कार्यपद्धतीने त्यांचा पक्ष प्रवेश घेत आहेत, पक्ष प्रवेशासाठी संपर्क साधत आहेत.

यापुर्वी अनेकदा अश्या प्रकाराबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांना महायुतीतील आचारसंहिते विषयी वरिष्ठांमार्फत योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु काही जबाबदार पदाधिकारी पुन्हा पुन्हा अश्या प्रकारचे वर्तन करत आहेत.

लवकरच राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत स्वप्न साकारण्यासाठी पार्लमेंट ते पंचायत तक आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहे. यासाठी महायुती मधील सहयोगी पक्ष यांच्याबरोबर समन्वय आणि संवाद गरजेचा आहे, अश्यावेळी स्थानिक पातळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी हे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध प्रलोभने दाखवून स्वतःच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर महायुती मधील सेना व भाजपा या पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे, आणि त्याचा फायदा निश्चितच विरोधी पक्षाला होणार आहे.

जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन चांगल्या प्रकारे आहे. सेना (शिंदे) ज्याप्रमाणे भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घेत आहे, त्यापेक्षा दुप्पटीने आम्ही त्यांच्याकडे आता असलेल्या कार्यकत्यांचे प्रवेश घेऊ शकतो, कार्यकर्ते तयार आहेत, परंतु निवडणूक समोर असताना आमच्या वरिष्ठांची अडचण होता नये, आपला पक्ष मोठा आहे, आमच्याकडून युतीचा धर्म मोडता नये यासाठी आम्ही गप्प आहोत. सेनेच्या या धोरणामुळे आमच्या प्रत्येक मंडल आणि जिल्हा बैठकीत स्वबळाचा आग्रह कार्यकर्ते पोट तिडकीने मांडतात. त्यांना आवरणे सुद्धा दिवसेंदिवस कठीण होत आहे. यासाठी हा विषय अधिक गांभीर्याने विचारात घ्यावा आणि प्रदेशाध्यक्ष व आपण आपल्या स्तरावरून या विषयाची गंभीरतेने दखल घेवून संबंधित सेना पदाधिकारी यांना त्यांच्या पक्ष प्रमुख वरिष्ठांमार्फत योग्य त्या सूचना दयाव्यात,अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page