⚡सावंतवाडी ता.२७-:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज सावंतवाडी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील विलंबावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गणेश चतुर्थी जवळ आली असतानाही अद्याप अकरावीचे वर्ग सुरू झाले नसल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाच्या अनास्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बाबुराव धुरी यांनी आपल्या भाषणात, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले असून, कोरोना काळात त्यांनी राज्याची ज्या पद्धतीने काळजी घेतली, ते अभूतपूर्व असल्याचे सांगितले. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि महाराष्ट्राला विकासात आघाडीवर नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करताना आनंद होत असल्याचे सांगून, शिक्षण हे देशाचे भविष्य असल्याने विद्यार्थ्यांनी आपले नाव कमवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. मोफत शिक्षण मिळायला हवे असताना, सध्या अकरावीचे वर्गही सुरू झालेले नाहीत, यावरून सरकार विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात, दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा श्रेया परब, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती रमेश गावकर, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख मायकल डिसोझा, नम्रता झारापकर, सुकन्या नरसुले, श्रृतीका दळवी, शहर संघटक निशांत तोरसकर, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, समिरा खलील, अशोक धुरी, सुनील गावडे, आशिष सुभेदार, सरपंच गुणाजी गावडे, विश्राम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील – रुपेश राऊळ
यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या भाषणात, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेऊन आपण काम करत असल्याचे सांगितले. जिल्हाभरात माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातही विविध कार्यक्रम आयोजित करून दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कोरोना काळात केलेले काम अलौकिक होते आणि त्यांनी तळमळीने महाराष्ट्राची काळजी घेतली. धारावीसारखी वस्ती वाचवण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले आणि जनतेला प्रेम दिले, असे राऊळ म्हणाले. उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि समाजातील प्रत्येक घटकाला मोठा आधार देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आत्मविश्वासाने यश मिळवा – श्रेया परब
महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत, प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासपूर्वक विद्यार्थ्यांनी यश मिळवावे असे आवाहन केले.
सन्मानित मान्यवर:
या सोहळ्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, प्रा. रुपेश पाटील, रक्तदान चळवळीतील बाबली गवंडे, देव्या सूर्याजी, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, समीरा खलील, स्मशानभूमीतील मारुती निरवडेकर, बंड्या धारगळकर, महालक्ष्मी भोजनालयाचे राजू भालेकर, जैबुन्नीसा पटेल, क्रीडा क्षेत्रातील जावेद शेख, संजय आईर, संतोष पाताडे यांच्यासह अनेक मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील व निशांत तोरसकर यांनी केले, तर प्रास्ताविक तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी केले.
फोटो
माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करताना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ,श्रेया परब, रमेश गावकर, चंद्रकांत कासार,मायकल डिसोझा, शैलेश गवंडळकर, शहर संघटक निशांत तोरसकर, अशोक धुरी
