शिवछत्रपतींच्या किल्ल्याचा वारसा जपतानाच इतिहास जाणून घ्या…

इतिहासकार सुधीर थोरात यांचे शिवप्रेमींना आवाहन:कुडाळ मध्ये रंगला शिव अभिमान सोहळा,युनेस्को वारसा स्थळ शिवकिल्ल्याच्या समावेशाचे औचित्य..

कुडाळ : मराठ्याची ओळख असणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत कोकणातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग व खांदेरी या किल्ल्याचा समावेश झाला आहे. सिंधुदुर्गातील अनेक संस्था अथक परिश्रम करून हा पुरातन वारसा जतन करण्याचे कर्तव्य बजावत आहेत. छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेला दुर्ग आणि किल्ल्याचा हा वारसा सांभाळून त्यांचा इतिहास जाणून घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे प्रमुख कार्यवाह सुधीर थोरात यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याबद्दल शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमी तसेच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था यांच्या वतीने आज शिव अभिमान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुधीर थोरात बोलत होते. कुडाळच्या मराठा समाज सभागृहात हा मेळावा शिवचछत्रपतींच्या जलघोषात संपन्न झाला. शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले शिवचरित्रावरचे व्याख्यान, चर्चासत्र आणि विध्यार्थ्यानी सादर केलेल्या विविध गीतांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
कोकणातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत करण्यात आला आहे.
हा आनंदाचा क्षण एकत्रितपणे साजरा करण्यासाठी या शिव अभिमान सोहळ्याच आयोजन कुडाळ मध्ये करण्यात आले होतं. .लोकमान्य टिळकांनी १८९५ रोजी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे तसेच शिव शंभू विचारमंच, शिवराज मंच, शिवप्रेमी संघटना, दुर्गवीर प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्ग मावळा प्रतिष्ठान, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमी तसेच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था मार्फत हा शिव अभिमान सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत माता आणि शिवप्रतिमा पूजन करून झाली. यावेळी व्यासपीठावर शिवशंभू विचार मंच, महाराष्ट्र राज्याचे संयोजक सुधीर थोरात, महाराष्ट्र राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीचे पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. सचिन जोशी, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य रुपेश मोरे, कोकण इतिहास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रणजित हिर्लेकर आणि सावंतवाडी येथील मोडीलिपी लेखक अभ्यासक विनायक महाबळ उपस्थित होते. या मान्यवरांचं स्वागत विवेक पंडित, भाऊ बाक्रे, रणजित हिर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ च्या विध्यार्थ्यानी सुरेल स्वागत गीत सादर केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याबद्दल या शिव अभिमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत. तोच धागा पकडून शिवशंभू विचार मंच, महाराष्ट्र राज्याचे संयोजक सुधीर थोरात यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज- एक प्रेरणा स्त्रोत’ या विषयावरच्या व्याख्यानातून शिवरायांचे जीवन चरित्र आणि त्यांची दुर्गसंपदा या विषयी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर कोकणामधील दुर्गसंवर्धन करणाऱ्या सर्व मंडळांचे एकत्रीकरण आणि या दुर्ग संवर्धनाच्या मोहिमांना एक ठोस दिशा तसेच शास्त्रीय माहिती देण्याच्या दृष्टीने यासंबंधीचे सखोल मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीचचे पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. सचिन जोशी यांनी याबाबत मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रम आणि शौर्याचा होता. त्यामुळेच त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांचा इतिहास हा वैभवशाली व रोमांचक होता. महाराजांचा जाज्वल्य इतिहास हा प्रत्येक पिढीला प्रेरणादायकच आहे. लहानपणापासून या शिवचरित्राचे धडे प्रत्येकाला दिले गेले तर प्रत्येकामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल. महाराजांच्या कोकणातील काही किल्ल्याची आजही वाईट परिस्थिती आहे. त्या किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्याला दिलेला वारसा सांभाळून त्यांचा इतिहास जाणून घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत श्री. थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बॅ नाथ पै विद्यालय कुडाळ, कुडाळ हायस्कुल कुडाळ, पणदूर कॉलेज, पणदूर, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा येथील विद्यार्थी उपस्थित होते. काही विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींवर आधारित गीत, पोवाडे सादर केले. यावेळी प्रसिद्ध मोडी लिपी अभ्यासक पंकज भोसले यांच्या माध्यमातून मोडीलिपी बाबत प्रदर्शनाचे देखील आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मोडीलिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे, मोडी लिपीतील जुने दस्तऐवज देखील मांडण्यात आले होते. सिंधुदुर्ग आणि कुडाळ मधील मोडी लिपीचे खास प्रशिक्षण घेऊन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कुडाळ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. पंकज भोसले यांनी यावेळी मोडी लिपी बाबतचे मार्गदर्शन सुद्धा केले. मोडी लिपी परीक्षेतील कुडाळमधील उत्तीर्ण विद्यार्थी अवधूत सप्ते, वैषाली वडर, श्रीकृष्ण शिरोडकर, अभिषेक रेगे, अनंत देसाई, सुचिता सावंत, प्रियांका देशमुख, नीरजा नागवेकर, संपदा राणे यांना गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला रुपेश मोरे, पंकज भोसले, अभिषेक रेगे, श्रीकृष्ण शिरोडकर, आनंद देसाई, विवेक पंडित, भाऊ बाक्रे, रमाकांत नाईक आदी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमासाठी शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page