येणाऱ्या पाच वर्षात अशा खेळाडूंना आवश्यक व्यासपीठ देण्याचा आपला प्रयत्न राहील…

पालकमंत्री नितेश राणे:जागतिक जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पूर्वा गावडे हिच्या नागरी सत्कार…

⚡ओरोस ता २६-: जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणी क्रीडा क्षेत्रात मोठे होवू पाहत आहेत. परंतू त्यांना आवश्यक सुविधा अस्तित्वात नाहीत, यांची खंत वाटते. मात्र, येणाऱ्या पाच वर्षात अशा खेळाडूंना आवश्यक व्यासपीठ देण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यातून जिल्ह्याच्या गावागावात पूर्वा गावडे तयार होतील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी जागतिक जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पूर्वा गावडे हिच्या नागरी सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

नुकत्याच सिंगापूर येथे संपन्न झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा गावडे हीची निवड झाली होती. तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अशाप्रकारे जलतरण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी पूर्वा ही जिल्ह्याची पहिली खेळाडू ठरली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन येथे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आणि सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्यावतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री राणे यांच्याहस्ते पार पडलेल्या या सत्काराला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, पंचायत समिती माजी सदस्य सुप्रिया वालावलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, ओरोस उपसरपंच पांडू मालवणकर आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री राणे यांच्याहस्ते पूर्वा हीचा शाल, श्रीफळ, आंब्याचे रोप, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्यावतीने सुध्दा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री कुडाळकर यांनी आपल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे सुविधा आहेत. परंतु त्यांना चालना देण्यासाठी माणसे नाहीत. त्यामुळे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी सारख्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री यांनी प्रयत्न करावा. राष्ट्रवादीचे क्रीडा मंत्री आहेत. आपण संयुक्तरीत्या त्यासाठी प्रयत्न करुया, असे पालकमंत्री राणे यांना सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष श्री सावंत यांनी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टीने काम केले पाहिजे. तसे केले तरच खेळाचा सन्मान होईल. भविष्यात या उणीवा भरून निघतील, असे आश्र्वस्त केले. यावेळी क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहत पूर्वा हीचे व्यक्तिगत अभिनंदन केले. तसेच तिच्यासोबत सेल्फी सुध्दा काढल्या. सूत्रसंचालक शरद सावंत यांनी केले. प्रास्ताविक लवू म्हाडेश्वर यांनी केले. आभार विनोद दळवी यांनी मानले.

चौकट
खेळाडूंचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे:- नितेश राणे
आयुष्यात शिस्त, त्याग महत्त्वाचा असून त्यातून स्वतःला घडविले पाहिजे. पूर्वा गावडे हीचे क्रीडा क्षेत्रात नाव मोठे होत आहे, यांचा मला अभिमान आहे. अशा खेळाडूंना आम्ही मदत करू. मात्र, ही मदत नसून आमच्यासाठी गुंतवणूक असणार आहे. येथील खेळाडूने राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविल्यास त्यामागे आमच्या जिल्ह्याचे नाव लागणार असल्याने त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असणार आहे. घाटावर किंवा मुंबई येथे पूर्वा गावडे हिच्या सारखे यश मिळविल्यास त्यांच्या स्वागतासाठी रस्ते कमी पडले असते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची ती मानसिकता नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी खेळाडूंचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे, असे सांगत पालकमंत्री राणे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यापुढे यश मिळविल्यास पूर्वा हीचे जिल्ह्यात जंगी स्वागत होईल. यापुढे भाऊ म्हणून पूर्वा हिच्या पाठीशी आपण राहणार आहोत, असे आश्र्वस्त केले.

चौकट
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी, आपल्या राज्य शासनाने क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणाऱ्या खेळाडूला थेट क्लास वन अधिकारी करण्याचे धोरण आहे. त्यांना एम पी एस सी परीक्षा द्यावी लागत नाही. पूर्वा या शासकीय नोकरी पासून एक पाऊल मागे आहे. त्यामुळे सातत्य आणि परिश्रम सोडू नकोस, असे पूर्वा गावडे हिला सांगितले.

मला ऑलिंपिकमध्ये पदक मिळवायचे आहे
मी जाड होते म्हणून मला स्विमिंगला घातले होते. परंतु मी थोडी आळशी असल्याने मला ते करायला आवडत नसायचे. यासाठी मी आईचा मार सुद्धा खालला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळाल्यावर झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविल्यावर मला क्रीडा प्रबोधिनिमध्ये प्रवेश मिळणार होता. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळू नये, असे मला वाटत होते. परंतु या स्पर्धेत यश मिळाल्याने माझी क्रीडा प्रबोधिनिसाठी निवड झाली. तेथे गेल्यावर मी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेत उतरून यश मिळविले. परंतु सिंगापूर येथील जागतिक जलतरण स्पर्धेला गेल्यावर माझे आई – वडील आणि गुरू यांनी माझ्यासाठी घेतलेली मेहनत माझ्या लक्षात आली. तेथे विजयी झालेल्या खेळाडूंचे होणारे कौतुक पाहून मी भारावून गेले. त्यावेळी मलाही वाटले की, आपणही जागतिक स्पर्धेत यश मिळवायचे आहे. लोकांनी आपल्या सोबत सेल्फी काढला पाहिजे. त्यामुळे मी मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानते. तुम्ही दाखविलेला विश्वास मी सार्थकी लावेन, असे सत्काराला उत्तर देताना जागतिक जलतरणपटू पूर्वा गावडे हिने सांगितले.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: जागतिक जलतरणपटू पूर्वा गावडे हीचा नागरी सत्कार करताना पालकमंत्री नितेश राणे सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ व अन्य

You cannot copy content of this page