परशुराम उपरकर:रवींद्र चव्हाण यांच्यासह दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेत निलेश राणेंचा विजय सुकर केला..
⚡कणकवली ता.२६-: भाजपमध्ये असताना आमदार निलेश राणे यांचा पक्षांतर्गत छळ झाल्यानंतर त्यांनी द्विट करीत राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती. पण, त्यानंतर ते हिमालयात गेलेले दिसले नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला व कुडाळ-मालवण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यामुळे निलेश राणे यांनी मला व वैभव नाईक यांना राजकीय संन्यास घेण्याचा फुकट सल्ला देऊ नये. ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला. महायुती सरकारमध्ये निलेश राणे यांना मंत्रिपद न मिळल्याने ते विरोधी पक्षाच्या आमदाराप्रमाणे भूमिका घेऊन महायुती सरकार व पालकमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत, असा आरोपही उपरकर यांनी केला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, राणे पित्रा-पुत्रांनी राजकीय स्वार्थासाठी किती पक्ष बदलेले हे जनतेला ज्ञात आहे. निलेश राणे यांनी भाजपमध्ये असताना पक्षाअंतर्गत घुसमट होऊ लागल्यानंतर ट्विट करीत राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली. त्यानंतर यू-टर्न मारत विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून तिकिट मिळविण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी लगेचच एक्स माध्यमावरील राजकीय संन्यास घेणार असल्याचे केलेले ट्विट हटविले होते, असेही उपरकर म्हणाले.
आमदार झाल्यानंतर निलेश राणे सोज्वळ झाल्याचे दाखवत आहेत. मात्र, खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते कशाप्रकारे वागत होते, हे त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले ठाऊक आहे. विधानसभेच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांच्यासह दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेत निलेश राणेंचा विजय सुकर केला. मात्र, निलेश राणे यांचा त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मित्रपक्षांना सोबत न घेता स्वबळावर लढवाव्या, अशी मागणी करून लागले आहेत. याचे आत्मचिंतन निलेश राणेंनी करावे, असा टोला उपरकर यांनी लगावला.
तर शिंदे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार की उदय सामंत यांच्याबरोबर जाणार हे त्यांनी जाहीर करावे. कारण एकनाथ शिंदेंपेक्षा आता उदय सामंत हे निलेश राणेंना देवासारखे वाटू लागले आहेत. त्यामुळे राणे हे राजकीय स्वार्थासाठी सामतांबरोबरच जातील, यात तिळमात्र शंका नाही. राणे पित्रा-पुत्र हे राजकीय स्वार्थासाठी कसे पक्ष बदलतात, हे जनतेला पुन्हा एकदा पाहता येईल. राणे पित्रा-पुत्रांच्या दलबदलू भूमिकेमुळे सिंधुदुर्गातील जनता त्यांना आगामी निवडणुकांमध्ये त्यांचे पार्सल मुंबई पाठवेल, असेही उपरकर म्हणाले.