काका कुडाळकर:रिक्त पदे भरण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेणार..
⚡सिंधुदुर्गनगरी ता २५-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची ३५० हून अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र ही रिक्त पदे भरण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत, जिल्ह्यातील रिक्त पदांची स्थिती आणि एकूणच जिल्हा परिषदेचा सुरू असलेला कासवगती कारभार पाहता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेणार असून जिल्ह्यातील रिक्त पदांवर डीएड उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने संधी मिळावी, या दृष्टीने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माहिती देताना काका कुडाळकर म्हणाले, सन २०१३ मध्ये शिक्षकपात्रता परीक्षेद्वारे शिक्षक पदे भरतीचे नवीन धोरण आले आणि येथील शेकडो डीएड उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. आजही या परीक्षेतील गोंधळामुळे सातत्याने शिक्षकांची पदे रिक्त राहिली आहेत. स्थानिक डीएड उमेदवारांच्या संघटनांनी गेली पाच वर्षे शिक्षकांच्या रिक्त जागी कंत्राटी पद्धतीने आम्हाला सामावून घ्या. अशी मागणी करत अनेक वेळा आंदोलने केली, नियोजन समिती सभेत तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांनी सन २०२३ मध्ये स्थानिक डीएड उमेदवारांना सामावून घेण्याबाबत शासन निर्णय काढला. मात्र त्यातील तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या नियुक्ती होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजी नव्याने शासन निर्णय काढून १० व १०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांना सामावून घेण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने केली असली तरी त्यावेळी जिल्ह्यात ४५० पेक्षा जास्त पदे रिक्त असताना केवळ ५५ सेवानिवृत्त शिक्षकांनी या भरतीसाठी प्रतिसाद दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहिली. ही रिक्तपदे भरण्यासाठी नियमित पदभरती केली जाईल असे सांगण्यात आले असले तरी आता शाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी अद्याप शासन अथवा जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ३५० हून अधिक रिक्त असलेली पदे भरण्यासाठी कोणतेही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. जिल्हा परिषदेचा कारभार कासवगतीने सुरू असून सांगली जिल्हा परिषदेने ३ जुलै २०२५ रोजी आपल्याकडे रिक्त असलेल्या पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त्या दिल्या आहेत. तशाप्रकारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने २३ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय पुनर्जीवित करावा. तसेच १५ मार्च २०२४च्या शासन निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करून निवृत्त शिक्षकाऐवजी स्थानिक डीएड उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने संधी द्यावी, यासाठी आपण शनिवारी पालकमंत्री नितेश राणे साहेब यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधणार आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत, या जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील शिक्षकांचा भरणा अधिक आहे. हे शिक्षक ३ वर्षाच्या सेवेनंतर आंतरजिल्हा बदलीने आपल्या जिल्ह्यात जातात. त्यामुळे येथील पदे कायमची रिक्त राहत आहेत. सिंधुदुर्ग हा डोंगराळ भाग असल्याने सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी काम करताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यापेक्षा जिल्ह्यातील रिक्त पदांवर स्थानिक डी एड उमेदवारांना संधी द्यावी तसेच जोपर्यंत अधिकृत भरती होऊन रिक्त पदावर कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त होत नाही तोपर्यंत कंत्राटी शिक्षकाला कायम ठेवावे. यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागेल तसेच येथे शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळू शकेल. याकडे पालकमंत्री तसेच माजी शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर व आमदार निलेश राणे यांचीही भेट घेऊन त्यांना आपण विनंती करणार आहे. अशी माहिती आज काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.