कट्टा येथील उबाठा शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांची वीज वितरण कार्यालयाला धडक…

⚡मालवण ता.२३-:
गेले अनेक कित्येक दिवस कट्टा व आजुबाजूच्या भागात प्रिपेड स्मार्ट मीटरमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने कट्टा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कट्टा वीज वितरण महामंडळाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रिपेड स्मार्ट मीटर बाबत भोंगळ कारभार सुरु राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच ग्राहकाची तक्रार नसताना मीटर बदलताना कर्मचारी आढळल्यास चोप देण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, अभय वाईरकर उबाठाचे पेंडुर विभागप्रमुख शिवा भोजने, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, शाखाप्रमुख पेंडुर निलेश हडकर, रमेश फाटक, दीपक गुराम, राहुल मालवदे, बाळकृष्ण मसुरकर, देवदास रेवडेकर, शेखर रेवडेकर, जगदीश मोरजकर आदी उपस्थित होते.

कट्टा परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो, गंभीर घटना घडल्यास अधिकारी उपलब्ध नसतात, नेहमी विजेचा लपंडाव सुरू असतो, फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसविले जात आहेत आणि वीज बिल तिनपटीने आकारले जाते. कोणत्याही ग्राहकांना पूर्वकल्पना सूचना न देता जुने मीटर काढून त्यावर नवीन स्मार्ट मीटर बदलले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिल जास्त येत असून ग्राहकांची लूट केली जात आहे त्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यापुढील काळात फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट मीटर बदलले गेले तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्याचबरोबर जास्तीचे डिपॉझिट घेत असल्याचे निदर्शनास आणून दिले. असा भोंगळ कारभार पुन्हा घडल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच कोणत्याही ग्राहकाची तक्रार नसताना अदानी कंपनीचे कर्मचारी येऊन मीटर बदलून जातात यावरून अधिक आक्रमक होत मीटर बदलताना आढळल्यास चोप देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

गणेश चतुर्थी सण जवळ येत असून स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल आलेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींनी करायचे काय असा प्रश्न विचारत पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जो कोणी अदानी कंपनीचा कर्मचारी हे मीटर बदलत आहे त्याला तात्काळ बोलवून घेण्याची मागणी लावून धरत प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी उपअभियंता श्री. कांबळे यांनी मागणीनुसार ज्या समस्या असतील त्या सोडवल्या जातील असे सांगितले. वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून स्मार्ट मीटरचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येईल, असे सांगितले.

You cannot copy content of this page