पालकमंत्री नितेश राणे:कुडाळ येथे अभाविपचा गुणगौरव कार्यक्रम..
कुडाळ : पुढील २५ वर्षांमध्ये आपला देश कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहे याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्याप्रमाणे शिक्षण घेऊन आपल्या भविष्यातील नोकऱ्या, उद्योग उभे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मराठा समाज हॉल येथे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे बंड्या सावंत तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक विनीत परब, कॉमर्स अकॅडमी संचालक सिताराम प्रभूदेसाई, शहर मंत्री दिग्विजय पवार, कार्यक्रम प्रमुख आर्या सावंत, सह शहर मंत्री अलविना फर्नांडिस आदी उपस्थित होते.
या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्यकर्ते नेते घडले तसेच चांगल्या नोकरदार व उद्योजक सुद्धा या व्यासपिवरून घडले आहेत त्यामुळे हे व्यासपीठ विद्यार्थीना घडवणारे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. पुढील काळामध्ये कोणत्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. याचा अभ्यास आताच विद्यार्थ्यांनी करून त्या पद्धतीचे शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. सध्या एआय शिक्षण पद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या क्षेत्रामध्ये भविष्यकाळात अनेक संध्या उपलब्ध होणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढणार आहे. त्याचाही विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असे सांगून अशा कार्यक्रमांकडे मी एक गुंतवणूक म्हणून पाहत आहे कारण हे विद्यार्थी भविष्य आहेत सर्वात तरुण असणारा भारत देश म्हणून भविष्यात उदयाला येणार आहे असे त्यांनी सांगून या ठिकाणी जे उद्योग उभे केले जाणार आहेत त्या उद्योगांमध्ये या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता असणार आहे. त्यामुळे विविध कौशल्य प्रशिक्षणे देण्याचा आमचा मानस आहे. असे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे याचा अभ्यास सुद्धा विद्यार्थ्यांनी करा मुंबईला जाण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात आई-वडिलांसोबत राहून व्यवसाय, नोकऱ्या करणे चांगले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कस्तुरी राऊळ यांनी केले.