⚡सावंतवाडी ता.१९-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे एनएसएस युनिट व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या संयुक्त विद्यमाने “स्कूल सेफ्टी प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती प्रसंगी संयम, तत्परता आणि योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता._
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी विभागाच्या एकूण कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. निरीक्षक आर.जे.यादव यांनी आपत्ती प्रसंगी एनडीआरएफ बजावत असलेल्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष मदत कार्याची चित्रफीत व प्रात्यक्षिके सुद्धा करून दाखवण्यात आली.
यात वैद्यकीय आपत्कालीन प्रशिक्षण – सीपीआर, बॅन्डेजिंग, स्ट्रेचर हाताळणी, भूकंप तयारी – ड्रॉप-कव्हर-होल्ड ड्रिल व सुरक्षित बाहेर पडण्याच्या पद्धती, पुरातून बचाव तंत्र – लाईफ जॅकेट, दोरखंड, बोट यांचा वापर, घरगुती लाईफ जॅकेट बनवण्याचे प्रात्यक्षिक, आग सुरक्षा प्रशिक्षण – आग कशामुळे लागते, ती कशी विझवायची, अग्निशमन यंत्रणा वापरण्याची पद्धत, धुरामुळे होणारे धोके व बचाव मार्ग इत्यादीचा समावेश होता.
कार्यक्रमाला प्रथम व द्वितीय वर्षाचे मिळून सातशे विद्यार्थी तसेच मंडळ अधिकारी उत्तम सावंत, तलाठी सुप्रिया घोडके, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य जी.ए.भोसले, ट्रेनिंग प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख मिलिंद देसाई, एनएसएस युनिट प्रमुख महेश पाटील, सर्व विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.