लाच स्वीकारल्याप्रकरणी मसुरे येथील तलाठ्यास रंगेहाथ पकडले…

⚡मालवण,ता.१८-:
वारस तपासासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मसुरे येथील तलाठी निलेश किसन दुधाळ (वय-२६) याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे.

मसुरे गावातील दोन ग्रामस्थ जमिनीचे वारस तपास करण्यासाठी मसुरे तलाठी कार्यालय येथे दोन महिन्यापूर्वी गेले होते. परंतु त्या ठिकाणी तलाठी उपलब्ध न झाल्याने व त्यांना तातडीने मुंबईला जायचे असल्याने त्यांनी याबाबतची कागदपत्रे ही गावातील संबंधित तक्रारदाराकडे सुपूर्द करत ती तलाठ्यांना देण्यास सांगितले होते. त्यानुसार तक्रारदाराने त्या ग्रामस्थांचे दोन्ही अर्ज तलाठी कार्यालयात जमा केले. हे दोन्ही अर्ज प्रलंबित होते. याबाबत तक्रारदाराने संबंधित तलाठ्याची भेट घेतली असता त्याने प्रत्येक वारस तपासासाठी २ हजार रुपये प्रमाणे दोन वारस तपासासाठी ४ हजार रुपये द्यावे लागतील असे कळविले. मात्र तक्रारदाराला पैसे देण्यात स्वारस्य नसल्याने त्यांनी १६ जुलै रोजी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सापळा रचला. यात तलाठी निलेश किसन दुधाळ याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम कदम, जनार्दन रेवंडकर, गोविंद तेली, विजय देसाई, अजित खंडे, स्वाती राऊळ, योगेश मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. निलेश दुधाळ याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे.

You cannot copy content of this page