नाट्य व्यवस्थपक नरेंद्र आंगणे यांनी केला आरवचा गौरव:झी च्या ‘ड्रामा ज्युनियर’ रियालिटी शो मधील यशाबद्दल पुरस्कार..
कुडाळ : येथील जि प पडतेवाडी शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या आणि विविध अभिनय, नृत्य व रियालिटी शो मधून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या कु. आरव सुरेश आईर याला २०२४ चा लिटिल थियेटर बालरंगभूमीच्या संचालिका सुधाताई करमरकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार नाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांनी आरव याला त्याच्या घरी जाऊन अलीकडेच प्रदान केला.
यावेळी नरेंद्र आंगणे यांनी सांगतिले कि, आरव याने झी निर्मित ड्रामा ज्युनियर या स्पर्धत प्राथमिक फेरी पासून अंतिम फेरीमध्ये उत्तम नाट्य प्रवेश सादर करत मजल मारली होती. त्याबद्दल त्याला हा २०२४ चा बालकलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पिंगुळी येथील आरवच्या घरी जाऊन नरेंद्र आंगणे यांनी हा पुरस्कार आरवला प्रदान केला.
आरव हा अगदी लहान असल्यापासूनच नृत्य, नाट्य कार्यक्रमातून तसेच स्पर्धनमधून यश मिळवीत आहे. झी मराठीवरील ड्रामा ज्युनिअर्स २०२४ या रियालिटी शो मध्ये तो अंतिम फेरीत पोहोचला होता. त्याने मुंजा, सोरट, दशावतार या चित्रपटातून अभिनय केला आहे. तसेच सन मराठी वरील क्षेत्रपाल श्री देव वेतोबा या मालिकेतील छोट्या लंगोटीवाल्या मुलाची त्याची भूमिका बरीच गाजली होती. अंधारमाया, अथांग, कल्की या वेबसिरीजमध्ये त्याने काम केले आहे. टाईम प्लीज, पाणखोल, पन्हं, सिंड्रेला या शॉर्टफिल्म, मन वाऱ्यावरी हा व्हिडीओ अल्बम यातून सुद्धा त्यांने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
डिम टॅंग डिटॅंग ही एकांकिका अटल करंडक एकांकिका स्पर्धा २०२३ पनवेल येथे पहीली आली होती . त्यातील गोपी या मुख्य भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला होता. तसेच अहमदनगर करंडक एकांकिका स्पर्धा लक्षवेधी बालकलाकार हा पुरस्कार मिळाला. ओणी एकांकिका स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बालकलाकार प्रथम, कणकवली येथे पुरूष कलाकार मधून द्वितीय बक्षीस त्याला मिळाले आहे. तसेच अनेक राज्य स्तरीय आणि जिल्हास्तरीय नृत्य आणि अभिनय स्पर्धांमधून अनेक वेळा क्रमांक आणि सन्मान प्राप्त झाले आहेत.. सिंड्रेला शाॅर्टफिल्म साठी बेस्ट चाईल्ड ॲक्टर हा पुरस्कार मिळाला.आहे. अशा या आरव सुरेश आईर याला लिटिल थियेटर बालरंगभूमीच्या संचालिका सुधाताई करमरकर स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
