⚡मालवण ता.१२-:
मालवण तहसील कार्यालयातील शासनाची सर्व्हर तांत्रिक यंत्रणा नेहमीच डाऊन असल्याने कॉलेज विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधासाठी लागणारे महसूली दाखले योग्य वेळेत मिळत नसल्याने या विरोधात आज राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने मालवण तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. भाजप सरकार हाय हाय… विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो… असे राज्य सरकारच्या व प्रशसानाच्या विरोधात नारे देत शासकीय दाखल्यांच्या नावाचे व निष्क्रिय भाजप सरकार या नावाचे पोस्टर जाळून शासकीय कारभाराचा निषेध व्यक्त केला.
मालवण तहसीलदार कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना शासकीय दाखल मिळण्यात अडचणी येत असल्याने याबाबत युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे यांनी दोन दिवसापूर्वी तहसीलदार वर्षा झाल्टे यांना निवेदन सादर करत लक्ष वेधले होते. मात्र तरीही सर्व्हर सुविधेबाबत सुधारणा न झाल्याने आज युवक काँग्रेस व काँग्रेस तर्फे मालवण तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडले. सरकारच्या विरोधात नारे देत शास कीय दाखल्यांच्या नावाचे व निष्क्रिय भाजप सरकार नावाचे पोस्टर जाळण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, आप्पा चव्हाण, चिंदर उपसरपंच महेंद्र मांजरेकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, गणेश पाडगावकर, पराग माणगावकर, सलाम मुजावर, विठ्ठल मेस्त्री, अल्मास शेख व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.
शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधासाठी लागणारे महसूली दाखले हे योग्य वेळेत मिळत नाहीत. शासनाची सर्व्हर तांत्रिक यंत्रणा नेहमीच डाऊन असते, यामुळे विद्यार्थी व नागरिकांना तहसीलदार कार्यालय – सेतू कार्यालय – ई महा सेवा केंद्र याठिकाणी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून त्यांना मनस्ताप होत आहे. तरी सर्व्हर सुविधा व्यवस्थित करून लवकरात लवकर दाखले देण्यात यावे, असे यावेळी आप्पा चव्हाण यांनी सांगितले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवकाशात भरारी घेण्याच्या गोष्टी करत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील पंतांच सरकार बहुजन समाजातील ओबीसी, एसबीसी गटातील मुलांनी शिकू नये, त्यांना मिळणाऱ्या सवलती मिळू नयेत, त्यांना प्रवेश मिळू नयेत यासाठी सर्व्हर डाऊन ठेवून पुरेपूर बंदोबस्त करत आहे, असा आरोप यावेळी अरविंद मोंडकर यांनी केला.