यशस्वी करियर साठी शैक्षणिक पात्रता नव्हे तर इतर गोष्टी सुद्धा आवश्यक…

विद्यार्थ्यांना अरविंद प्रभू यांचे मार्गदर्शन:संत राऊळ महाराज महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन..

कुडाळ : यशस्वी करिअरसाठी केवळ शैक्षणिक पात्रता नव्हे तर आत्मविश्वास, संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्यही महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन इंडोको रेमेडीज लि.चे सहाय्यक व्यवस्थापक अरविंद आर. प्रभू यांनी केले. क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जागृती निर्माण करून त्यांना योग्य दिशा व प्रेरणा मिळावी या उद्देशाने “Career Motivation for Students” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. प्रभू बोलत होते. IQAC (Internal Quality Assurance Cell) व Placement and Career Counselling Cell यांच्या संयुक्त विद्यमाने . या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद आर. प्रभू यांच्यासह डॉ. आर. वाय. ठाकुर, डॉ. एस. एस. लोखंडे व डॉ. डी. जी. चव्हाण आदी उपस्थित हतोय. अरविंद प्रभू यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून करिअर निवडीची प्रक्रिया, त्यामागील मानसिक तयारी, उद्योग जगतातील सध्याची गरज आणि भविष्यातील संधी यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
​ कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून करिअरशी संबंधित शंका दूर केल्या. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या दिशेने सकारात्मक दृष्टीकोन मिळाला असल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
​ अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच उद्योगजगतातील गरजेनुसार स्वतःला तयार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळा हेच उद्दिष्ट पूर्ण करतात. तसेच आपल्या शैक्षणिक वर्षांमध्ये मिळालेले गुण आपल्या करिअरसाठी फारसे महत्त्वाचे नसून व्यावहारिक, ज्ञान, अनुभव, आपुलकी त्याचबरोबर आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण हे यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असते. आपण जंगलाच्या राजा सिंहासारखा औरा – रुबाबदारपणा निर्माण केला पाहिजे. त्याचबरोबर आपण वाचन केलं पाहिजे त्याच्यातून शब्द साठा वाढवला पाहिजे. भाषेवर प्रभुत्व निर्माण केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण आपलं उद्दिष्ट, आपलं विजन आणि आपलं मिशन याचा आपण पाठलाग केला पाहिजे. तरच आपण जीवनात यश प्राप्त करू शकतो आणि आपण यशस्वी होण्यासाठी सकारात्मकता आपल्यात असणे गरजेचे आहे.असे डॉ. सुरवसे यांनी सांगितले.
या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक IQAC समन्वयक डॉ. आर. वाय. ठाकुर यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. एस. एस. लोखंडे व डॉ. डी. जी. चव्हाण यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षकवर्ग, IQAC व समुपदेशन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page