दहशतीला भिक घालणारे आम्ही शिवसैनिक नाही…

रूपेश राऊळ:दहशतवादावर आवाज उठवणारे केसरकरांनी आपली भूमिका जाहीर करावी..

⚡सावंतवाडी ता.०९-: प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संबंधित तावडे, चव्हाण कुटुंबाच सांत्वन करून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र, यादरम्यान एका अनोळखी नंबरवरून पालकमंत्री नितेश राणेंसोबत असलेले ‘आपला हितचिंतक’ असा संदेश टाकत फोटो पाठवलेत. या मॅसेजचा अर्थ आम्ही काय समजायचा ? अशा दहशतीला भिक घालणारे आम्ही शिवसैनिक नाही अस विधान उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केले. तसेच दहशतवादावर आवाज उठवणारे केसरकर एका महिलेला मारहाण होताना गप्प का ? त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी आव्हान त्यांनी दिले.

श्री. राऊळ म्हणाले, सावंतवाडीत प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चर्चा आहे. पोलिस प्रशासनावर आमची शंका नाही. परंतु, संशयीत आरोपींना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळू नये ही आमची रास्त मागणी आहे. संशयीतांना अटकपूर्व जामीन झाला असला तरी चौकशी झाली पाहिजे. सह आरोपी करून न्यायालयात ते हजर करुन तीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तावडे, चव्हाण कुटुंबाला आधार देण्याच काम आम्ही केलं. कोणत्याही प्रकारच राजकारण करण्याचा आमचा हेतू नव्हता. मात्र, काल रात्री मला एक मेसेज आला. त्यात मला नितेश राणेंसोबत असलेले ‘आपला हितचिंतक’ असा संदेश टाकत फोटो पाठवले गेले अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, या मॅसेजचा अर्थ आम्ही काय समजायचा ? या प्रकरणाशी राणेंचा काही संबंध आहे का ? राणे आमचे नेते आहेत असं सांगायच आहे का ? की माझा नेता आहे असं सांगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ? असा सवाल त्यांनी केला. मी स्वतः याबाबत पोलिसांत जाणार नाही. पोलिसांनी मला बोलावलं तर मी जाईन. असल्या धमक्यांना भीक घालत नाही. ट्रू कॉलरवर सुमित काळे असं नाव येतं आहे. त्यामुळे याचा तपास पोलिसांनी करावा. हा काळे संशयीत माने कुटुंबाशी संबंधित असल्यास त्याला सह आरोपी करावं. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही. आमचा हेतू केवळ प्रिया चव्हाण हीच्या कुटुंबाला न्याय देण्याचा होता. कोणीतरी आमच्या पाठीशी आहे असा मेसेज देऊन दहशत दाखवून आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे उलट तो आणखीन वाढेल असे मत व्यक्त केले.

दरम्यान, आमदार दीपक केसरकर यांनी या प्रकरणाची साधी दखल घेतली नाही. कुटुंबाच सांत्वन केलं नाही. ज्या केसरकरांनी दहशतवादावर नेहमी आवाज उठवला ते आज गप्प का ? त्यामुळे येणाऱ्या काळात याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. एका महिलेला मारहाण होताना केसरकर गप्प का राहिले ? त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी असं आव्हान त्यांनी दिले. यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शहरप्रमुख शैलेश गौंडळकर, अशोक धुरी, फिलिप्स रॉड्रिग्स आदी, आशिष सुभेदार, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page