‘नेत्र तपासणी वाहना’चा लोकार्पण सोहळा उद्या…

अनंत उचगांवकर:सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन..

सावंतवाडी : रोटरी क्लब सावंतवाडी व रोटरी क्लब सेंट सायमन इजलॅण्ड यु.एस.ए. रोटरी डिस्ट्रीक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध झालेल्या नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंडच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा ‘नेत्र तपासणी वाहना’चा लोकार्पण सोहळा उद्या स. १०.३० वा. संपन्न होत आहे. नॅब सिंधुदुर्गच्या या ऑप्थाल्मिक मोबाईल व्हॅनचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उचगांवकर यांनी केले आहे. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. उचगावकर म्हणाले, रत्नागिरीसह आपल्या जिल्ह्यात ही व्हॅन कुठेही नव्हती. आता ती उपलब्ध झाली आहे. यामुळे आता गावात जाऊन देखील मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. त्याच व्हॅनचा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ने-आण करण्याकरिता उपयोग होईल. जिल्ह्यातील प्रत्येक खेडेगावात जाऊन ही सेवा द्यावी असा मानस आमचा आहे. कमीत कमी वर्षाला ३६ हजार शस्त्रक्रिया होतात. गरीब लोकांना मोतीबिंदू लक्षात येत नाही. अगदी माफक दरात ही शस्त्रक्रिया आम्ही करत आहोत. ज्याची परिस्थिती हालाखीची आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया आम्ही करणार आहोत. शासनाची कोणतीही योजना अद्याप नाही. रोटरीच्या ग्लोबल ग्रॅण्ड खाली ही ४० लाखांची गाडी उपलब्ध झाली आहे. यासाठी बरेच प्रयत्न आम्ही केलेत. शासनाच्या महात्मा फुले योजनेसाठी नॅब हॉस्पिटलचा प्रयत्न राहणार आहे. आजही आम्ही बऱ्याच लोकांवर शस्त्रक्रिया करत आहोत. सुसज्ज असे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आम्ही उभारले आहे. उद्या या मोबाईल व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नॅब सिंधुदुर्गचे सचिव सोमनाथ जिगजीन्नी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रो. ॲड. सिद्धार्थ भांबूरे, सचिव रो. सिताराम तेली, रो.डॉ. विनया बाड, रो.आनंद रासम,, रो. सुबोध शेलटकर, रामदास पारकर, आबा कशाळीकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page