⚡बांदा ता.०५-: बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्र शाळेच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत बांदा केंद्रशाळा ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित केलेली वारकरी दिंडी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वेशभूषेमुळे लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडी मुळे बांदा शहरात विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले.
महाराष्ट्रातील पंढरपूर येथे असलेले विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायायाचे मुख्य ठिकाण आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला मोठी यात्रा असते या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे माहिती व्हावी यासाठी बांदा गावातील प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत शाळेच्या वतीने या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वारकरी दिंडीत विद्यार्थी विठ्ठल- रखुमाई , विविध संत व वारकरी यांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते.या दिंडीत विद्यार्थ्यांनी केलेला रिंगण सोहळा, फुगड्या आकर्षक ठरल्या.शाळेपासून निघालेली दिंडी गांधी चौकातून विठ्ठल मंदिरात पोचल्यावर विठ्ठल मंदीर देवस्थान कमिटीच्या वतीने दिंडीतील विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.विठ्ठल मंदीरात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सादर केलेल्या अभंगगायन,फुगड्यांना उपस्थित विठ्ठल भक्तांची वाहवा मिळाली. ही आनंददायी वारी यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे,कृपा कांबळे ,प्रसन्नजित बोचे व पालकांनी यांनी परिश्रम घेतले.