⚡मालवण ता.०२-:
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेतीबाबत आवड निर्माण व्हावी ,शेतीची प्राथमिक माहिती मिळावी या हेतूने कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण सेवा योजना माझी वसुंधरा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधून एक दिवस बळीराजासाठी अर्थात बांधावरची शेती हा उपक्रम राबविण्यात आला. कट्टा येथील प्रयोगशील शेतकरी सुधीर उर्फ बापू वराडकर यांच्या शेतीत विद्यार्थ्यांनी बांधावरची शेती अनुभवली.
शेतकरी सुधीर वराडकर यांचा गत वर्षी मालवण तालुक्यामध्ये भात पिक स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. विद्यार्थ्यांनी सुधीर वराडकर यांच्या शेतात जाऊन नांगरणी कशी होते, भात लावणी कशी करतात, खत कोणतं वापरतात, श्री पद्धतीने लावणी कशी केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी सुधीर वराडकर यांच्यासह सौ. स्वाती वराडकर उपस्थित होत्या. वराडकर यांनी भात लागवडी संबंधी शास्रोक्त माहिती दिली. शास्त्रोक्त पद्धतीने भात पीक लागवडीचे फायदे त्यांनी मुलांना पटवून दिले. तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या कोणकोणत्या संधी आहेत त्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी मुलांनी भात पीक लागवडीचे प्रात्यक्षिकही केले.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यावरण सेवा योजना, माझी वसुंधरा विभाग प्रमुख समीर चांदरकर, हरित सेना विभाग प्रमुख बाळकृष्ण वाजंत्री, शिक्षिका अमिषा परब व विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल (सेवानिवृत्त )शिवानंद वराडकर, ऍड.एस एस पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर,शेखर पेणकर, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर, सर्व संचालक यांनी शुभेच्छा दिल्या.