⚡मालवण ता.०२-: आमदार रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने एक मत्स्य शेतकरी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाला आहे. मत्स्य शेतीमधील आणि मत्स्य व्यवसायामधील खाचखळगे माहीत असलेला एक दृष्टा नेता प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे महाराष्ट्राला नीलक्रांती लवकरच अनुभवण्यास मिळेल, अशी आशा भाजपचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक व नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष बनलेल्या आमदार रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्रात कर्तबगार मंत्री म्हणून तर राजकीय वर्तुळात कुशल संघटक आणि कोकणामध्ये तर प्रत्येक भाजपा कार्यकर्ता बरोबर नाळ जोडलेला नेता म्हणून ओळखले जाते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलण्यासारखे खूप आहे. मात्र ते एक यशस्वी मत्स्य शेतकरी आहेत याची बऱ्याच जणांना माहिती नाही. समुद्रातील मासेमारी ते गोड्या पाण्यातील रास पद्धतीने केलेली मत्स्यशेती किंवा रंगीत मासे ते शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन असेल, असे वेगवेगळे प्रयोग त्यांनी स्व:खर्चाने केले. व्यावसायिक स्वरूपात त्याला यश कसे मिळेल याचेही त्यांनी यशस्वी मॉडेल तयार केले. त्यांचा केसरी,सिंधुदुर्ग येथे असलेला मत्स्य प्रकल्प हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मत्स्य शेतकऱ्यांनी बघावा असाच आहे. समुद्रातील मासेमारी ते केसरीतील अत्याधुनिक मत्स्य शेती या प्रवासाच्या कालखंडामध्ये त्यांना बऱ्याच वेळा मोठ्या अडचणींना सामना करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले नीलक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी मत्स्य शेतीला कुशल व्यवस्थापन, तंत्रज्ञान, आर्थिक जोड आणि व्यावसायिकता याची जोड दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर नेत्यांनी आपल्या सदिच्छा भाषणांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष बनू शकतो याचा वारंवार उल्लेख केला. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज एक मत्स्य शेतकरी महाराष्ट्रातीलच नव्हे देशातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाच्या देशातील अग्रगण्य महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे, असे रविकिरण तोरसकर यांनी सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायिक, मच्छीमार, मत्स्यशेतकरी यांच्याकडून पुढील वाटचालीसाठी तोरसकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.