पडीक शेतीला सामूहिक शेतीचा पर्याय; वर्दे पासून करूया सुरुवात !

बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांचे आवाहन:वर्दे येथे कृषी दिन उत्साहात साजरा..

कुडाळ : शेतात काम करायला माणसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता शेती करणे सोडून दिले आहे. त्यामुळे बऱ्याच शेत जमिनी पडीक राहत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीचा विचार करणे आवश्यक आहे. सामूहिक शेतीची ही सुरुवात वर्दे गावापासून करूया असे आवाहन कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. वर्दे ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी मेळाव्यानंतर वर्दे येथील जनार्दन गंगाजी कुंभार यांच्या शेतात भाताच्या रत्नागिरी ८ या वाणाच्या श्री पद्धतीच्या लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत आवारात वृक्षलागवड सुध्दा करण्यात आली.
पंचायत समिती कुडाळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत वर्दे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वर्दे ग्रामपंचायत हाॅल येथे कृषी दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, मुळदे विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता विजय दळवी, वर्दे सरपंच महादेव पालव, उपसरपंच प्रदिप सावंत,जि.प.चे समाजकल्याण  अधिकारी बाळकृष्ण परब, निवृत्त प्राध्यापक शरद नाईक, कृषी अधिकारी सचिन चोरगे, तालुका कृषी अधिकारी गायत्री तेली, विस्तार अधिकारी श्री.खरात आदी उपस्थित होते.
सुरुवातीला वर्दे जिल्हा परिषद शाळा ते वर्दे ग्रामपंचायत पर्यंत वृक्ष दिंडी काढण्यात आली,या दिंडीत विविध वेशभुषा परिधान केलेल्या चिमुकल्या शाळकरी मुलांनी झाडे लागवड व संवर्धन बाबत घोषणा दिल्या. त्यानंतर वर्दे ग्रामपंचायत आवारात वृक्षलागवड करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत हॉलमध्ये कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ विजय दळवी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच महादेव पालव आणि उपसरपंच प्रदीप सावंत यांनी केले.
यावेळी बोलताना विजय दळवी म्हणाले की, आधार कार्ड प्रमाणे एग्रीस्टॅक महत्वाचा आहे.शेतकरी भाताच्या बोनसापासून वंचित आहे.जे शेतकरी खरेदी विक्री संघात भात विकतात त्यांनाच बोनस मिळतो. जर अन्य ठिकाणी भात विक्री केली तर खरेदी विक्री स़घात त्यांची नोंदणी करा म्हणजे ते शेतकरी भाताच्या बोनसपासून वंचित राहणार नाही असे आवाहन केले. त्याच बरोबर शेतात मशिनरीचा सुध्दा विचार केलाच पाहिजे.नव्हे आता मशिनरींची गरजच आहे.जमीन ही जीवंत आहे, जमीन ही बोलते, झाडे सुद्धा बोलतात. तुमची आवड निवड बदला. काही आवश्यकता असेल तर जरुर या, आम्ही मार्गदर्शन करु असे प्रतिपादन उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.विजय दळवी यांनी केले. 
  प्रफुल्ल वालावलकर म्हणाले की,आजच्या कृषी दिनी सामुहिक शेतीचा प्रयोग करावा, यासाठी आपले प्रयत्न आहेत,जेणेकरून आपला हा प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवाला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली व शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली. .बाळकृष्ण परब यांनी पारंपारिक व अपारंपरिक बियांबाबत माहिती देत समाजकल्याण व महाराष्ट्र ग्रामीण विकास योजनेची माहिती दिली. यावेळी प्रा.नाईक म्हणाले की,आपली ऐपत ही आपण सिध्द करुन दाखवली पाहिजे. कृषी मध्ये भरपूर पैसा आहे, चांगले आरोग्य आहे पण तुम्हाला वेळ देता आला पाहिजे. हे लक्षात ठेवा. जेवढे तुम्ही श्रम कराल तेवढी ती जमीन आपल्याला रिटर्न खूप देवू शकते.असे सांगत कृषी बाबत आपले अनुभव व्यक्त केले. यावेळी सचिन चोरगे म्हणाले की, सद्यस्थितीत आता आपल्याला गुणवत्ता पुर्ण अन्न मिळणे आवश्यक आहे.त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत सर्वांनी लक्ष देणे आवश्यक ‌आहे. आपल्या पारंपरिक बियाणाचे काम सध्यस्थितीत केले जाते आहे. भात पिक बियाणे,लागवड,माती परिक्षण ,खतांची फवारणी याबाबत अचूक मार्गदर्शन केले.यावेळी कृषी अधिकारी विजय भोंगे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. गायत्री तेली यांनी ही तालुका कृषी विषयक योजनांची माहिती दिली.  
        
शेतकरी-अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

कुडाळ तालुका भातपिक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये संतोष अंकुश गावडे (प्रथम),आनंद रामचंद्र सावंत (द्वितीय),रामचंद्र महादेव केसरकर(तृतीय) यांचा समावेश होता. मात्र एकही शेतकरी उपस्थित न राहिल्याने त्या -त्या भागातील कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला.
सहाय्यक कृषी अधिकारी रोशन मर्गज, सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खर्डे,सविता हरमलकर, ग्रामपंचायत अधिकारी भाग्यश्री सावंत, प्रसन्ना म्हाडगुत,प्रविण चव्हाण, रविकांत सावंत, विष्णू तेर्से, गोविंद तोरसकर, साक्षी पालव, संदिप सावंत, रुपेश नाईक, सतिश साळगावकर, तांत्रिक कर्मचारी मंदार पाटील, संकेत पुनाळेकर,रूपेश चव्हाण आदीचा सन्मान करण्यात आला. गावांमध्ये चांगलं काम करत असलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अज्ञात कदम, सुखदा पालव, सुधीर सावंत, सुनील राणे, दैवी कुपेरकर आदिंचा सुपारी रोप, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामसेविका ते ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती झालेल्या सौ.पालव यांचा सुध्दा सन्मान करण्यात आला. ग्राम पंचायत अधिकारी सपना मस्के यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच वर्दे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात आला.ॲग्रीकार्ट शेतकरी उत्पादक कंपनी पणदूर यांनी विविध भात बियाणे ग्रामपंचायत वर्दे मध्ये प्रदर्शन करीता ठेवले होते.
या कार्यक्रमात शेतकरी,नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश परब यांनी करून शेवटी आभार मानले. यावेळी मेळाव्यानंतर वर्दे येथील जनार्दन गंगाजी कुंभार यांच्या शेतात भाताच्या रत्नागिरी ८ या वाणाच्या श्री पद्धतीच्या लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, शरद सावंत यांनी या प्रात्यक्षिकात सहभागी होत एक काडी लावणी केली.

You cannot copy content of this page