⚡बांदा ता.२८-:
बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शनिवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आरंभ झाला.सप्ताहाचे पारप्रमुख,सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम वीणा,समई व तबला,पेटी,टाऴ आदी सर्व भजन साहित्य श्री विठ्ठल रखुमाई चरणी ठेवण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ भजनकर्मी गिरिकाका महाजन आणि वीणा सप्ताह नियोजनप्रमुख प्रकाश उर्फ भाऊ मिशाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वीणा व सर्व साहित्याचे पुजन करून गाऱ्हाणे घालण्यात आले.ठिक १२ वाजता पहिला पार आळवाडाचे सदस्य प्रितम हरमलकर , संतोष नाटेकर यांचेकडे वीणा देण्यात आला व नामाच्या गजरात प्रदक्षिणा करुन सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी भजन व आरती करुन प्रसाद वाटण्यात आला.
या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.५ जुलै रोजी सप्ताहाची सांगता होणार असून बुधवार दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० स्थानिक महिलांची भजनसेवा व रात्री १० ते १२ या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा होईल.
फोटो – ( बांदा श्री विठ्ठल वीणा सप्ताह आरंभ प्रसंगी उपस्थित पारप्रमुख ,सेवेकरी व भाविक )