विजय गांवकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

ओरोस ता २४
विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२५ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी हे पुरस्कार रौप्य महोत्सवी वर्षात प्रदान होत असून प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियातील उल्लेखनीय योगदानासाठी निवडक पत्रकार व संस्था यांना गौरविण्यात येणार आहे. या वर्षीच्या या नारद पत्रकार पुरस्कारासाठी
सिंधुदुर्गातील दूरदर्शनचे प्रतिनिधी विजय गांवकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षीचा पुरस्कार समारंभ २८ जून २०२५ रोजी ‘शिर्के विद्यालय रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – एयर मार्शल (सेवानिवृत्त) हेमंत भागवत असून प्रमुख वक्ते म्हणून अभिजीत हरकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. निशीथ भांडारकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार सोहळा भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा व राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला मान्यता देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विश्व संवाद केंद्र, मुंबई यांचा दृढ विश्वास आहे की पत्रकारिता केवळ माहितीचा वाहक नसून, राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे. सत्य आणि तथ्यावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या निर्भीड पत्रकारांना प्रोत्साहन देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे देवर्षी नारद पत्रकार सन्मान आहे. या प्रसंगी, एकूण चार श्रेणींमध्ये पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळ्यात वृत्तपत्र विद्या विषयात विशेष गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी सदस्य प्रसाद काथे, विनायक पात्रुडकर, सरिता कौशिक, मिलिंद भागवत आणि प्रणव भोंदे यांच्याद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वांनी या कर्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती विश्वसंवाद केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.

चौकट
वरिष्ठ पत्रकार म्हणून अरविंद कोकजे, रत्नागिरी,उल्लेखनीय कार्य (प्रिंट मीडिया): श्रीराम पुरोहित, कर्जत, उल्लेखनीय कार्य (इलेक्ट्रॉनिक मीडिया), विजय गावकर, सिंधुदुर्ग उल्लेखनीय कार्य (सोशल मीडिया), संदेश फडकले या चौघांना या वर्षीचे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

फोटो:- विजय गांवकर

You cannot copy content of this page