विहिरीत पडलेल्या दुर्मिळ खवले मांजराला स्थानिकांकडून जीवदान…!

⚡बांदा ता.१९-: इन्सुली खामदेव नाका येथील नीलेश सावंत-पटेकर यांच्या घरालगत असलेल्या विहिरीत पडलेल्या दुर्मिळ खवले मांजराला वनविभागाच्या जलद कृती दलाच्या सहकार्याने स्थानिकांनी जीवदान दिले.
नीलेश सावंत यांचे घर मुंबई गोवा महामार्गलगत असून त्यांच्या घराच्या समोरच विहीर आहे. मुसळधार पावसाने विहीर तुडुंब भरली आहे. काल सायंकाळी उशिरा घरातील सदस्यांना विहिरीत दुर्मिळ खवले मांजर पडल्याचे निदर्शनास आले. निलेश सावंत यांनी तात्काळ याची माहिती बांदा वन विभागाला दिली.
सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, पत्रकार निलेश मोरजकर यांच्यासह बांदा वनरक्षक गजानन सकट यांनी घटनास्थळी धाव घेतली. निलेश सावंत यांनी दोरीच्या सहाय्याने खवले मांजराला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले. त्याची प्राथमिक तपासणी करून त्याला बांदा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
वनविभागाच्या जलद कृती दलाचे बबन रेडकर, शुभम कळसुलकर, राकेश अमरुसकर, तांबोळी वनरक्षक सुयश पाटील, ओदक शास्ता, विठोबा बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते. खवले मांजराला रात्री उशिरा सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. खवले मांजर हे दुर्मिळ प्रजातीत आहे. त्याच्या खवल्याना मोठी मागणी असल्याने त्याची तस्करी होते.

You cannot copy content of this page