नागरिकांनी मानले दीपक पाटकर यांचे आभार..
मालवण : (प्रतिनिधी)
मालवण धुरीवाडा मार्गावर दोन वर्षांपूर्वी वीज खांब तुटून त्याचे मूळ असलेला लोखंडी भाग अर्धवट स्थितीत रस्त्यावर राहिल्याने अपघाताना निमंत्रण ठरत होता. गेले काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे तर वीज खांबचा लोखंडी भाग अधिकच वर आल्याने अपघातांचा धोका वाढला. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले. पाटकर यांनी तात्काळ गॅस कटर उपलब्ध करून देत रस्त्यावर जमिनीत असलेला लोखंडी वीज खांब तोडून काढला व मार्ग मोकळा करून दिला.
धुरीवाडा मार्गावर तौक्ते वादळानंतर दोन वर्षा पासून ही स्थिती होती. रस्त्याच्या कडेला अर्धवट स्थितीत असलेला हा वीज खांब अपघाताना कारण ठरत होता. गाड्या पंक्चर होत होत्या. रात्रीच्यावेळी सायकल व पदचारी यांना अडथळा ठरत होता. याबाबत वीज वितरण, नगरपरिषद यंत्रणा यांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र कार्यवाही झाली नाही. स्थानिक नगरसेवक यांच्या माध्यमातूनही प्रश्न सुटला नव्हता हे स्पष्टपणे दिसून आले. याबाबत स्थानिक नागरिक समीर शेख यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्या नंतर महेंद्र पारकर यांनी ललित चव्हाण व शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले. पाटकर यांनी तात्काळ गॅस कटर उपलब्ध करून वीज खांब काढला. यावेळी समीर शेख, वैभव तोंडवळकर, हेमंत पाडावे यांसह अन्य नागरिक उपस्थित होते, अशी माहिती महेंद्र पारकर यांनी दिली.
जे काम दोन वर्षे झाले नाही ते दीपक पाटकर यांनी एका दिवसात केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगत दीपक पाटकर यांचे आभार मानले. तर दीपक पाटकर यांनी जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवणे हे आपले प्रमुख कर्तव्य असले पाहिजे, ही खास. नारायण राणे यांची शिकवण आहे. त्यानुसार आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्यरत आहोत, असे सांगितले