१६ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ:शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांची माहिती
⚡सिंधुदुर्गनगरी ता १३-:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष -२०२५- २६ साठी १६ व १७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे .यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी खास स्वागत समारंभाचे आयोजन केले जाणार आहे.जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यात सहभागी होणार आहेत.अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी दिली .
माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार “१०० शाळांना भेटी देणे” हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियोजन पूर्वक राबविला जात आहे जिल्ह्यातील सर्व शाळा १६ जून २०२५ पासून सुरू होत आहेत शाळेचा पहिला दिवशी सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांनी १६ व १७ जून रोजी प्रत्येक एका शाळेला भेट द्यावी असे शासनाचे निर्देश आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मधील पटसंख्या वाढवणे समाज पालक यांचा शिक्षणाचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, बालकाने आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे . गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी यावर्षी दत्तक शाळा योजना ही राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातील ५० पेक्षा जास्त पट असलेल्या शाळा शासकीय अधिकाऱ्यांनी दत्तक घ्यायचे आहेत या शाळाला वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी वर्षभर भेट देतील. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता भौतिक सुविधा विद्यार्थ्यांच्या गरजांची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करतील या शाळा भेटीचे नियमित अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करणे अनिवार्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासनाने विशेष प्रचार मोहीम राबवण्याचे ठरवले आहे शाळेच्या पहिल्या दिवशी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश याचे वितरण करण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल वाढविण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात अशी अपेक्षा आहे .शाळेतील भौतिक सुविधेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार यासारख्या विविध विषयाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे .
पालकांना शाळांमध्ये उपलब्ध सुविधा शिष्यवृत्ती योजना व उपक्रमाची माहिती दिली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकूण १३४४ शाळा आहेत पहिल्या दिवशी १६ जून रोजी लोकप्रतिनिधी व जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकारी व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख जिल्हा समन्वयक विषय तज्ञ विशेषतज्ञ शिक्षक असे सर्व २४२ शाळांना भेटी देणार आहेत तर दुसऱ्या दिवशी १७ जून रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व सर्व संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी २३६ शाळांना भेटी देणार आहेत या दोन्ही दिवशी अरे शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण होणार आहे १६ व १७ जून या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी एकूण ४७८ शाळांना भेटी देणार आहेत .या प्रवेशामध्ये प्रमुख भर पहिलीच्या प्रवेशात वाढ करण्यावर असेल यासाठी शाळा तालुका व जिल्हा पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत .या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कविता शिंपी यांनी दिली .