हळदीचे नेरूर शाळा इमारत दुरुस्ती काम सुरू…

आम. निलेश राणे यांच्या पुढकाराने रखडलेले काम सुरू..

कुडाळ : तालुक्यात माणगाव खोऱ्यातील केंद्र शाळा हळदिचे नेरूर नं.१ शाळेच्या दोन वर्ग खोल्या इमारतीचे बंद अवस्थेत असलेल्या कामांची दखल आ. निलेश राणे यांनी घेतली. दुसरीकडे अवघ्या काही तासात प्रशासकीय व ठेकेदारांची यंत्रणा अलर्ट होवून प्रत्यक्षात दोन दिवसांत कामाला सुरुवात करण्यात आली. रखडलेले शाळा इमारतीचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यामध्ये हळदीचे नेरूर या दुर्गम भागातील गावात १९५२ मध्ये दोन वर्ग खोल्यांची मातीची इमारत शाळेसाठी उभी करण्यात आली होती. बहुधा त्यावेळी ती लोकसहभागातून बांधली असावी. त्या शाळेच्या इमारतीत ६३ वर्षं मुलानी अभ्यासाचे धडे गिरविले. शाळेची इमारत मातीची असल्यामुळे ६३ वर्षानंतर सहाजिकच ती कमकुवत झाली होती, त्यामुळे त्या इमारतीचे फेब्रुवारी २०२५ मध्ये निर्लेखन करण्यात आले. निर्लेखनानंतर मार्च २०२५ मध्ये त्या इमारतीला जिल्हा वार्षिक २०२४/२५ मधून २ वर्ग खोल्या मंजूर झाल्या. मंजुरीनंतर ठेकेदाराने ती इमारत जमीन दोस्त करून टाकली होती. मात्र नवीन काम सुरू केले नव्हते. त्यातच यावर्षी अवकाळी पावसाने पंधरा-वीस दिवस आधीच हजेरी लावल्यामुळे ठेकेदाराने शाळा इमारतीच्या कामाकडे काहीसे दुर्लक्ष केले. पावसाळा सुरू झाल्यामुळे आता आपल्या मुलांची गैरसोय होणार, आपल्या मुलांची सोय कशी करणार? असा यक्ष प्रश्न शिक्षक वर्गांना पडला होता. दुसरीकडे पालक वर्गातून सुद्धा चिंता व्यक्त केली जात होती. अखेर याबाबतची सर्व माहिती आ. निलेश राणे यांना सोमवारी कुडाळ येथील दौऱ्यात मिळाली. माहिती मिळताच आ.निलेश राणे यांनी आपल्या यंत्रणेला त्या शाळेचे काम तात्काळ सुरू झालेच पाहिजे अशा सक्त सुचना दिल्या.
हळदिचे नेरूर शाळेच्या रखडलेल्या कामाची दखल आ.निलेश राणे यांनी घेतल्याची माहिती प्रशासन व ठेकेदार यांना समजताच प्रशासन व ठेकेदारांच्या यंत्रणेची धावाधाव सुरू झाली. आणि दोन दिवसात म्हणजेच बुधवारी ठेकेदारांने हळदीचे नाव नंबर १ शाळा इमारतीचे काम सुरू केले. शाळा इमारतीचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यामुळे येथील पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले तसेच निलेश राणेंच्या कार्यपद्धतीचे सुद्धा कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page