⚡सावंतवाडी ता.१२-: बेळगाव, कर्नाटक येथील बेळगाव बुदधिबळ असोसिएशनने “ऑल इंडिया क्लासिकल रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे” आयोजन केले होते.तीन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील चारशे त्रेपन्न खेळाडूंनी सहभाग घेतला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी बाळकृष्ण पेडणेकर, मयुरेश परुळेकर, यथार्थ डांगी, विभव राऊळ, चिदानंद रेडकर, पुष्कर केळूसकर यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा वीस वर्षीय राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून स्पर्धेत नववा क्रमांक पटकावला.विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत बाळकृष्ण अपराजित राहीला.बाळकृष्णने नऊ राऊंडमध्ये सहा राउंड जिंकत तीन राउंड बरोबरीत सोडवले आणि साडेसात गुण केले.क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्ज या तीनही प्रकारात बाळकृष्णने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे.शालेय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण राज्य स्तरीय निवड चाचणीसाठी चार वेळा आणि राष्ट्रीय निवड चाचणीसाठी दोन वेळा निवड झालेला कोकणातील एकमेव खेळाडू आहे.जागतिक विजेता भारतीय बुदधिबळ खेळाडू विश्वनाथ आनंद यांच्या पुणे येथील बुदधिबळ कोचिंग कँपसाठी दोनशे खेळाडूंची निवड करण्यात आली.या कँपसाठी निवड झालेला बाळकृष्ण पेडणेकर हा कोकणातील एकमेव खेळाडू होता.
या स्पर्धेत ॲकेडमीचा पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवण येथील एकोणीस वर्षीय विदयार्थी मयुुरेेश परुळेकर याने गटात प्रथम क्रमांक पटकावला.यापूर्वी देखील मयुुरेेशने राष्ट्रीय स्तरावरील आणि युनिवर्सिटीच्या महाविदयालयीन स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करुन अनेक पारितोषिके मिळवली आहेत.तेरा वर्षीय यथार्थ डांगी या विदयार्थ्याने प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेऊन चांगला खेळ केला.यथार्थने या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले.मागील दहा वर्षात ॲकेडमीच्या तब्बल तेवीस विदयार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे सर यांच्या मार्गदर्शनखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.युवराज लखमराजे भोंसले यांनी या विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बाळकृष्ण पेडणेकरचे राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन…
