नितिन गडकरी यानी केली घोषणा महाराष्ट्रातील सात जिल्ह्याना दिला निधी
मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यामधील रस्त्यांसाठी कोट्यावधींच्या निधीची घोषणा केलीय. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्ते व पुलांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव-मसुरे मार्गावरील तळाणी वाडी येथील पुलाच्या बांधकामासाठी ३.८२कोटी मंजूर करण्यात आले असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात बहुतांश वेळा या पुला वरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा व्हायचा. उंचीने कमी असलेल्या पुलावरून मोठ्या वाहनांसह छोट्या वाहनांना सुद्धा कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत असे. मसुरे येथे मालवण वरून येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने पावसाळ्याच्या दिवसात शालेय तसेच महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना पुलावर पाणी असल्यास माघारी परतावे लागायचे. यामुळे शैक्षणिक नुकसान सुद्धा सहन करावे लागत होते. याबाबत माजी खासदार निलेश राणे तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामांसाठी मोठा निधी मंजूर केल्यामुळे रस्ते प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.
