अश्रूंचे महाकवी म्हणजे साने गुरुजी…

प्रा अरुण मर्गज:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत साने गुरुजी पुण्यतिथी साजरी..

कुडाळ : जगाला प्रेम अर्पावे असा जगाला संदेश देणारे, मानवता हाच खरा धर्म आहे अशी धर्माची परिभाषा जगाला देणारे अश्रूंचे महाकवी म्हणजेच साने गुरुजी होय”. असे उद्गार बॅ. नाथ पै महिला/रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले.बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. मर्गज बोलत होते .
प्रा. मर्गज पुढे म्हणाले, बलसागर भारत होण्यासाठी जातीभेद विसरून, धर्मभेद विसरून, ऐक्याचा मंत्र जपत सर्व भारतीयांनी भारत बलशाली बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या साने गुरुजींच्या स्फूर्ती गीताचा , शिकवणीचा सर्वांनी आदर्श घ्यावा. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या, कामकार्‍यांच्या हक्कासाठी रान उठवून, पेटून ऊठण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले. श्यामची आई, या आत्मकथनाबरोबरच नवा प्रयोग, भारतीय संस्कृती, स्त्री जीवन, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती ,समाज धर्म, अशा विविध ग्रंथांच्या वाचनातून आजच्या पिढीने संस्कारित होण्याची गरज आहे .कारण ते मानवतेचेच नव्हे तर शब्दांचेही पूजक होते. त्यांच्या शिकवणी प्रमाणे हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपत या समाजासाठी या देशासाठी कार्य करायला युवकानी तत्पर राहिले पाहिजे. असे सांगत समाज हितासाठी साने गुरुजींच्या जीवन चरित्राचा आदर्श समोर ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी सीबीएसई बोर्डाच्या सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, अश्विनी परब, चित्रा कुंटे, प्राजक्ता जाधव प्रिया केडगाळे ,रोहिदास राणे व इतर सर्व सहकारी शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी’ खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेचे एकसुरात गायन केले. व साने गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली.

You cannot copy content of this page