फ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळातर्फे गोव्यासाठी नि:शुल्क कोच सेवा…

कुडाळ : फ्लाय९१ या गोवास्थित प्रादेशिक विमानसेवेने चिपी विमानतळावरून हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार वेळा उपलब्ध असून, सध्या सुरू असलेल्या सिंधुदुर्ग–पुणे मार्गासोबतच हे नवीन मार्गही प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, आरामदायक आणि अखंड करण्याच्या उद्देशाने फ्लाय९१ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ ते गोवा (पणजी) दरम्यान मोफत कोच सेवा सुरू केली असून, त्यामुळे प्रवाशांना अंतिम गंतव्यापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर गोवा या भागांसाठी हवाई प्रवास अधिक सोयीचा आणि सुलभ होणार आहे.
ही कोच सेवा फ्लाय९१ची टियर २ आणि टियर ३ शहरांना जपोडण्याची कटिबद्धता दर्शविते. “प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ व त्रासमुक्त बनवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. गोवा मार्गे सिंधुदुर्ग विमानतळाशी जोडणाऱ्या या कोच सेवेची सुरुवात ही त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण आणि विचारपूर्वक पाऊल आहे,” असे फ्लाय९१चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी लाँचप्रसंगी सांगितले.
“सिंधुदुर्ग विमानतळ आणि गोवा यांच्यातील ‘लास्ट-माईल’ कनेक्टिव्हिटी ही लक्झरी कोच सेवेमुळे सुनिश्चित होत आहे. यामुळे पुण्यातील प्रवाशांना सहजतेने पणजीपर्यंत पोहोचता येईल, तसेच गोव्यातील प्रवाशांसाठी पुण्याकडे परत जाण्यासाठी विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होईल. सुरुवातीच्या काळात ही सेवा ठरावीक कालावधीसाठी मोफत दिली जाईल आणि नंतर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यल्प शुल्कात उपलब्ध केली जाईल,” असे सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार व प्रमुख कॅप्टन जयसिंग सदाना यांनी सांगितले.

You cannot copy content of this page