आयुर्वेद उपचार पद्धतीचा स्वीकार करा…

अवंतिका कुलकर्णी:नेरूर येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ..

कुडाळ : आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती एक सुंदर पर्याय आहे .कारण त्या उपचारांचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. आपली ध्येय स्वप्न प्राप्त करायची असतील तर निरोगी आयुष्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. असे उद्गार सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ.अवंतिका कुलकर्णी यांनी काढले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, आयुष मंत्रालय भारत सरकार आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या सहकार्याने नेरूर येथेआयोजित मोफत आयुर्वेदिक उपचारांच्या महाशिबिरामध्ये अध्यक्ष स्थानावरून सौ. कुलकर्णी बोलत होत्या. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ४१० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय आयुर्वेदगुरु तथा पंचकर्म निष्णात चिकित्सक वैद्य डॉ मुरलीधर प्रभूदेसाई, डॉ .माधुरी प्रभूदेसाई , डॉ प्रशांत ससाणे, डॉ प्रवीण भट, नाक व कांन , नेत्र तज्ज्ञ डॉ.दत्तप्रसाद पवार, डॉ अंकिता मसुरकर (स्त्री रोग तज्ञ), डॉ .स्वाती पटेल, डॉ.नितेश हुकरे, न्यायाधीश गजानन कुलकर्णी, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते गणपत वेंगुर्लेकर,संस्था सीईओ अमृता गाळवणकर, रणजीत देसाई, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन, इत्यादी उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून व धन्वंतरीच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. सौ. अवंतिका कुलकर्णी पुढे म्हणाल्या, आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये आयुर्वेदाची कास धरल्यास जास्त काळ निरोगी राहू शकतो. आणि या संदर्भात बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी त्यांच्या संस्थेच्या विविध शिक्षणक्रमाच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक उपचार महाशिबिराचे आयोजनकरणे हा एक महत्त्वपूर्ण व समाज उपयोगी उपक्रम आहे. यासाठी आमच्या कायम शुभेच्छा असणार आहेत. आम्ही जेवढी आमच्यातर्फे मदत करता येईल तेवढी करू, असे सांगत शिबिराच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
या महा शिबिराचे उद्घाटक तथा प्रमुख अतिथी डॉ मुरलीधर प्रभू देसाई म्हणाले, भारताला भूषणावह असणारी आयुर्वेद परंपरा माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याची जाणीव ठेवून बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी त्यांच्या विविध शिक्षणक्रमांच्या सहकार्याने हे जे महा आयुर्वेदिक उपचार महाशिबिर आयोजित केलेले आहे; हा उपक्रम अतिशय स्तुत्य व कौतुकास्पद आहे. ऍलोपॅथिक उपचारांचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी व लोकांना वेदना मुक्त जीवन जगण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती ही महत्त्वपूर्ण असल्याचे आता जगभरामध्ये पटलेला आहे. जग त्याचा पाठपुरावा करत आहे. आणि याबाबतची जाणीव जागृती करून लोकांना निरोगी वेदना विरहित जीवन जगण्यासाठी अशा प्रकारचे मोफत आयुर्वेदिक तपासणी व मोफत औषध पुरविणाऱ्या शिबिरचे आयोजन विविध शासकीय व सेवाभावी संस्थांच्या मदतीने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने केलेले आहे. हा एक उत्तम सामाजिक जाणीव जागृतीचा उपक्रम आहे. असे म्हणून शिबिरास त्यानी शुभेच्छा दिल्या.
लोकांना कायदेविषयक माहिती मिळावी या दृष्टीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस यांच्यातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन कक्ष उभारण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने बोलताना कुडाळ न्यायालयाचे न्यायाधीश गजानन कुलकर्णी म्हणाले, चांगले आरोग्य मिळणे हा जसा आपला अधिकार आहे ;तसाच योग्य न्याय मिळणे हा सुद्धा संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे; त्याचा उपयोग लोकांना करता आला पाहिजे. यासाठी त्यांना आपल्या अधिकाराची माहिती असणे गरजेचे आहे .म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या कक्षातून ही कायदेशीर माहिती देण्यात येईल; त्याचा लोकांनी उपयोग करावा असे आवाहन केले.
रणजीत देसाई यांनी या शिबिरात शुभेच्छा देताना उमेश गाळवणकर व त्यांचे सहकारी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीच्या नात्याने असे विविध उपक्रम राबवत आहेत. हे फार स्तुत्य आहे. ते स्वतःची पदर मोड करून निरपेक्षपणे हे काम करत असतात ;आजच्या काळात ही भावना दुर्मिळ होत चाललेली आहे. यासाठी उमेश गाळवणकर यांचे कौतुक करावे तेवढेच थोडे .असे सांगत शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
शिबिर समन्वयक डॉ.ससाणे यांनी शिबिराचे आयोजन करण्यासाठी सहकार्य केलेल्या विविध संस्थांचे आभार व्यक्त करून, अशा प्रकारचे शिबिर आयोजन करण्याची सुसंधी मिळाल्याबद्दल व शिबिरास उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल लोकांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त केले. या शिबिरामध्ये एकूण ४१० रुग्णांनी विविध उपचाराचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थिताना चहा पान,नाश्ता व अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रणाली मयेकर हिने केले. शिबिर यशस्वीतेसाठी डॉ .सायली गावडे व त्यांचे सहकारी, बीएमएस स्टुडंट आदित्य राज, अर्चित सोनी, गणपतसिंग राजपुरोहित, सुप्रिया मिश्रा ,तवीशी शर्मा , संस्थेच्या पल्लवी कामत,नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा. वैशाली ओटवणेकर डॉ.प्रा पलटासिंग ,प्रा सुमन करांगळे _सावंत, प्रा शांभवी आजगावकर , प्रा प्रथमेश हरमलकर, प्रा शंकर माधव ,व त्यांचे विविध विभागाचे प्राध्यापक, प्रसाद कानडे, नर्सिंग कॉलेज व फिजिओ थेरपी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मनोज वालावलकर ,स्वानंद सामंत, अभय वालावलकर, रोहन देसाई, गणपत वेंगुर्लेकर, प्रा. अरुण मर्गज इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page