बांदा : प्रतिनिधी
रोणापाल माऊली मंदिर समोरील रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरून पडल्याने नारायण दिलीप नाईक (रा. रोणापाल) हे जखमी झाले. समोरून येणाऱ्या ट्रेम्पो ट्रॅव्हलरला साईड देताना अपघात होऊन ते जखमी झाले. सदर धोकादायक खड्डा तातडीने बुजवावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नारायण नाईक हे गोवा येथे कामावर जाण्यासाठी रोजच्या प्रमाणे मोटरसायकलने निघाले होते. माऊली मंदिर नजीक समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला साईड देताना साईडपट्टी लगतच्या भल्या मोठ्या खड्डयात मोटरसायकलचे चाक गेले व ते खाली कोसळले.
अपघातात नारायण नाईक किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने बाबल तुयेकर, सचिन कुबल यांनी उपचारासाठी बांदा येथे नेले. सदर रस्त्यावरील खड्डा बुजविण्याची मागणी तानाजी गावडे यांनी यापूर्वीच संबंधित खात्याकडे केली होती. परंतु याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केले. सध्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची शक्यता बळावली आहे. रस्त्यावरील धोकादायक खड्डा तत्काळ बुजवावा. अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी दिला आहे.
