मळगाव घाटातील अपघातप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करा…

रुपेश राऊळ यांची मागणी: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांची घेतली भेट..

⚡सावंतवाडी ता.०३ अक्षय धुरी -: येथील मळगाव घाटात गॅस पाईपलाईनसाठी रस्त्याच्या कडेला मारण्यात आलेले चर नीट बुजवले गेले नसल्यामुळे रस्त्यावर माती साचली आणि त्या मातीमध्ये घसरून एक दुचाकीस्वार अपघातात मृत्युमुखी पडला. या गंभीर घटनेनंतर ठेकेदारावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आज सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पोलीस निरीक्षकांकडे केली.

यावेळी राऊळ यांनी पोलीस निरीक्षकांना जाब विचारत प्रकरणात तातडीने कृती करण्याचा पुनरुच्चार केला. पोलीस निरीक्षकांनी “या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले. मात्र, आठ ते दहा दिवसांत जर कारवाई झाली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा ठाम इशाराही राऊळ यांनी प्रशासनाला दिला.

या प्रसंगी राऊळ यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यावर धडक देत निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला.

You cannot copy content of this page