⚡बांदा ,ता.२०-: बांदा शहर व परिसराला आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारी सुरु झालेली पावसाची झोड सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. पावसाच्या कहराने बांदा शहरात पाणीच पाणी झाले. बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे पुलावर पावसाचे पाणी साठल्याने वाहतूक खोळंबली होती.
आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी शहरात जोरदार पावसास सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. तब्बल तीन तास पावसाने झोडपल्याने शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. तर काही ठिकाणी धिम्या गतीने वाहतूक सुरु होती. ग्रामीण भागाला देखील मुसळधार अवकाळी पावसाचा फटका बसला. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या आंबा, काजू, तसेच कोकम पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. वादळी पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फ़ांद्या रस्त्यावर कोसळल्या. उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थोडासा दिलासा मिळाला.
सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच असल्याने याचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर तसेच बाजारपेठेवर देखील झाला.
बांदा शहराला अवकाळी पावसाने झोडपले…
