शिवसेनेच्या कार्यकाळात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात

मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप*

*💫कुडाळ दि.२९-:* माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झुंडशाहीचा व दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून ही बाब भूषणावह नाही. असे मत मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वी कुडाळ मध्ये एका खाजगी सोनोग्राफी सेंटर वर तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांच्या सहकाऱ्यांना रुग्णालयात डांबून ठेवत मारहाणीचा प्रकार घडला होता तर काल परवा बेकायदा वाळू व्यवसायावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुडाळ तहसीलदार व त्यांच्या सहकारी तलाठ्यांवर काही मद्यधुंद वाळू तस्करांनी जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय त्यांच्या गाडीवर दारूच्या बाटल्या फोडून आठ ते दहा गाड्यांनी त्यांचा पाठलाग करत जीव घेण्याची धमकीही देण्यात आली असल्याची चर्चा कुडाळ मध्ये सुरू आहे. यापूर्वी ही त्यांना ठाकरे सरकार मधील एका मंत्र्याच्या भावाने फोन वरून धमकी दिल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आली होती. या अशा घटना जिल्ह्याच्या आजवरच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या असून अशा गंभीर घटना घडून देखील राजकीय वरदहस्तामुळे संबंधीतांवर कोणतीही कारवाई होत नाही आहे. हे सगळं घडत असताना मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का असा प्रश्न जनतेला पडलेला असल्याचे पण त्यांनी यावेळी म्हंटले आहे. अशा घटनांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिक सेवा देणारे अधिकारी राजरोस चाललेल्या दडपशाहीने नैराश्याच्या गर्तेद असल्याचे चित्र निर्माण झाले असून शासकीय अधिकाऱ्यांनाचं न्याय मिळत नसेल तर त्यांची अशी दयनीय अवस्था असेल तर सर्व सामान्यांच्या बाबतीत न बोललेलंच बरे..! असे देखील ते म्हणाले आहेत. एखाद्या प्रकरणात अधिकारी चुकत असेल किंवा दोषी असेल अशा बाबतीत कायदेशीर प्रक्रिया करून कारवाई होऊ शकते परंतु अशाप्रकारे कर्तव्य बजावणी पासून रोखणे, मारहाण करणे, अपमानास्पद वागणूक देणे निंदनीय आहे. कायदा हा धनाढ्य व सत्ताधाऱ्यांसाठी नसून तो फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचे हात राजकीय दबावाखाली बांधले गेले आहेत, अधिकाऱ्यांची गळचेपी होतेय अशाने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिहार च्या धर्तीवर गेल्यासारखीच आहे. पोलीस प्रशासनाने विषाची परीक्षा न घेता भविष्यातील संकट ओळखून सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती आहे. राजरोस चाललेल्या या दहशती विरोधात प्रसंगी मनसे रस्त्यावर उतरेलच मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी व संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी पुढे येऊन रस्त्यावर उतरावे मनसे आपल्या पाठीशी आहे. असे आवाहन मनसेच्या वतीने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page