आरवलीमध्ये जलजीवनची कामे अर्धवट…

वेंगुर्ला प्रतिनिधी- आरवली गावात जलजीवन योजनेंतर्गत मंजूर असलेली कामे सद्यस्थितीत अर्धवट स्थितीत असून, बंदावस्थेत आहेत. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सहका-यांसमवेत १५ मे रोजी एक दिवसाचे लाक्षिणक उपोषण छेडणार असल्याचा इशारा आरवलीचे माजी सरपंच मयुर आरोलकर यांनी दिला आहे.

  आरवलीचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते  मयुर आरोलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आरवली गावात जलजीवन योजनेंतर्गत कामे मंजूर आहेत. मात्र, ती अर्धवट स्थितीत असल्याने गावात पाणीटंचाई उद्भवत आहे. लाखो रुपये खर्च करून राबवत असलेली योजना धुळखात पडली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र खेबूडकर यांना लेखी निवेदन देऊनही अद्यापपर्यंत काम सुरु करण्यासंदर्भात कोणतेही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. ‘हर घर जल हर घर नल‘ असे ब्रीद वाक्य असलेली ही जलजीवन योजनेची आरवली गावातील स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या योजनेबाबत अधिकारी कसे उदासीन आहेत, हे दिसून येत आहे.

  गावात मुबलक पाणी असताना पंपिंग मशिनरी व पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्याने ठेकेदार आणि अधिकारी यांच्या उदासनेतेमुळे गावात पाणीटंचाई उदभवत आहे. त्यामुळे उपोषणाचा इशारा आरवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते मयुर आरोलकर यांचेसह आरवलीचे उपसरपंच किरण पालयेकर, संजय आरोलकर, कृष्णा येसजी, उत्तम चव्हाण, विलास चिपकर, आबा टाककर, महेश आरोलकर, बंड्या मेस्त्री यांनी दिला आहे.

फोटो – मयुर आरोलकर

You cannot copy content of this page