बांदा येथे २३ लाखाची दारू जप्त; मात्र संशयित पसार…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; लाकडी पॅलेटच्या आडून करत होता वाहतूक..

बांदा,ता.१०: राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने बेकादा दारू वाहतुकीविरोधात आज मोठी कारवाई केली. इन्सुली तपासणी नाक्यावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो मधून होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई करत २३ लाख ९७ हजाराच्या दारूसह १५ लाखाची गाडी व १० हजाराचा मोबाईल असा एकूण ३९ लाख ७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मात्र चालक फरार झाला. ही कारवाई आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहनांची तपासणी करत असताना आयशर टेम्पो मध्ये लाकडी पॅलेट च्या आडून दारू वाहतूक केली जात होती. यावेळी चालकास विचारणा केली असता गाडीतून मालाचे बिल घेऊन येतो असे सांगून चालक इतर वाहनांचा आधार घेऊन फरार झाला. या प्रकरणी अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान दीपक वायदंडे, अभिषेक खत्री, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत.

You cannot copy content of this page