अध्यक्षा सौ सावंत यांच्यावर टिका करणाऱ्या उपरकर यांना मिलिंद मेस्त्रींचा प्रश्न;मक्तेदारी झालेल्या अधिकाऱ्यांची बाजू न घेण्याचा सल्ला
*💫कणकवली दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा कोरोना महामारीत संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका संजना सावंत बजावत आहेत.डॉक्टर्स,आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहत आहेत. ज्या स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे,लाडपांगे अहवालात गोरगरीब लोकांचे पैसे खाऊन अडकलेल्या अधिकाऱ्यांना परशुराम उपरकर यांनी पाठीशी घालू नये. परशुराम उपरकर त्यांचा अभ्यास करुन दोषींवर कारवाईसाठी प्रयत्न करावेत.कारण मनसेच्या श्री.गावडेंनी आयुक्तांपर्यत तक्रार केली,त्यानुसार आयुक्तांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी,असे जिल्हा परिषद अध्यक्षाचे म्हणणे आहे.मग आता मनसेच्या नेत्यांची भूमिका का बदलली आहे?संजना सावंत व सर्व सभापती सक्षम असून पती सांगून काम करण्याची गरज नाही.जिल्हा परिषद अध्यक्षा दोन वेळा निवडून सभागृहात गेल्या,तसेच अध्यक्षा म्हणून यापूर्वी काम केल्याचा दांडगा अनुभव आहे.त्यामुळे परशुराम उपरकर यांनी महामार्ग,वने,मायनिंग व अन्य विषयांवर आवाज उठवला,त्याचे काय झाले?केवळ जनतेची दिशाभूल करु नये,असा उपरोधक टोला भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री यांनी लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली एक आदर्श जिल्हा परिषद म्हणून काम करत आहेत. त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. कारण या ठिकाणी जे पदाधिकारी नेमले जातात ते पूर्णपणे सक्षम आणि एक जिल्ह्याला दिशा देणारे असतात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी पुन्हा एकदा संजना सावंत यांची निवड झाली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,आता नाटळ जिल्हा परिषद मधील विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला,त्याचा चौकशी अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल आला आहे,त्याचीही माहिती परशुराम उपरकर यांनी घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजणारे काही अधिकारी आहेत, ते स्वतःची मक्तेदारी तयार करून जिल्हा परिषद मध्ये चुकीच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संजना सावंत करत असतील,तर त्यांची भूमिका योग्यच आहे.कारण जिल्हा परिषद मध्ये कुठल्याही कर्मचारी व अधिकाऱ्यांची मक्तेदारी चालणार नाही .या ठिकाणी समाजसेवेचे काम होण्याच्या दृष्टीने संजना सावंत व त्यांचे सहकारी काम करत आहेत. काही स्थानिक अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागणूक देत आहेत. त्यांच्या मार्फतच ही माहिती परशुराम उपरकर यांच्याकडे गेली असून उपरकर यांनी केलेले आरोप हे पूर्णता खोडसाळपणाचे आहेत. परशुराम उपरकर हे माजी आमदार आहेत त्यांच्याबद्दल सन्मानच आहे, मात्र अर्धवट माहितीच्या आधारावर केलेले आरोप हे निराधार आहेत. त्यांनी चुकीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये सध्या चाललेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कामाबद्दल कौतुकच करावे ,असेही मिलींद मेस्त्री यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
