उद्योजकांसाठी सिंधुदुर्ग पोषक वातावरण असलेला जिल्हा…

पालकमंत्री नितेश राणे:सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ संपन्न..

ओरोस ता ३०
राज्य सरकार जे चांगले काम करेल त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाटा असणार आहे. विकास प्रकल्प, विविध उद्योग, पर्यटन आणि कृषी विकास या सर्वांमध्ये सिंधुदुर्गचा वाटा मी हक्काने मागून आणणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उद्योघाकांसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा आहे. त्यात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत देशातील उद्योजकांनी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातच गुंतवणूक करायची आहे, असे म्हटले पाहिजे, असे वातावरण निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ मध्ये बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एक दिवसीय जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंत्री राणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांच्यासह अन्य अधिकारी, गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून प्रवास करत असताना नेमका कसा आकार घेतोय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज झालेले सामंजस्य करार, आज झालेली गुंतवणूक ही आमच्या जिल्ह्यासाठी निश्चित फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाला अजून मोठा करण्याचा मानस मी व्यक्त करतो. ही परिषद तीन चार दिवसांची भरावी. यावेळी किमान ५०० करार व्हावेत, असा आपला प्रयत्न आहे. आपल्या जिल्ह्याची प्रतिमा उद्योग जगामध्ये, गुंतवणूकदारांमध्ये उंचावायची आहे. का सिंधुदुर्गमध्ये तुम्ही गुंतवणूक करावं यासाठी असंख्य कारणे द्यायला लागतात. आम्ही आपल्या गुंतवणूकदारांसाठी, उद्योजकांसाठी नेमकं काय काय करू पाहतोय ? काय काय सुविधा आम्ही देत आहे ? कशा कशामध्ये आम्ही सवलत देतोय ? या सगळ्याचा पण एक प्रेझेंटेशन गुंतवणूकदारांच्या समोर झालं पाहिजे, अशा मतांचा मी आहे. तुम्ही येथे गुंतवणूक करता म्हणजे खिशातले पैसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुंतवतो तर आपल्या कंपनीला नफा झाला पाहिजे आणि जिल्ह्याच्या तरुण-तरुणीच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीच्या दुहेरी फायदा आम्ही पाहत आहोत. त्यासाठी पोषक वातावरण आम्ही निर्माण करणार आहोत, असे सांगितले.

You cannot copy content of this page