माऊली विद्यालयात सावंत फाउंडेशनचे आयोजन..
कुडाळ : अंतराळातील अंतरंगाच्या अंतरंगात नेमकं दडलंय तरी काय हे खरं तर जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असते. पण ते जाणून घेण, उघड्या डोळ्यान पाहणं शक्य नसत. हेच जाणून सावंत फौंडेशन संचालित डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली यांनी गोवा विज्ञान केंद्र पणजी यांच्या सहकार्यान चेंदवणच्या श्री देवी माऊली विद्यालयात शनिवारी रात्री आकाशदर्शन कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्याबरोबरच पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी या पहाटे पर्यंत चाललेल्या कार्यक्रमाचा लाभ घेतला. नेहरू सायन्स सेंटर मुंबईच्या शीतल चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दुर्बिणीच्या साहाय्याने उपस्थितांना आकाशदर्शन घडवलं.
कुडाळ तालुक्यात चेंदवण हायस्कूल मध्ये आकाशदर्शन, आकाशाचे अंतरंग ग्रह तारे यांचे मार्गदर्शन व दुर्बीणीमधून आकाशदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन शाळा संस्था उपाध्यक्ष शरद शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक, नेहरू विज्ञान केंद्राच्या शीतल चोपडे, श्री. आडेकर, आकाशवाणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश उर्फ बंड्या जोशी, दैनिक सकाळचे कुडाळ प्रतिनिधी अजय सावंत सावंत, पत्रकार तथा कवठीचे पोलीस पाटील विठ्ठल राणे, सावंत फाउंडेशनचे सचिव शरद सावंत, शाळा समिती सदस्य संजय नाईक, संस्था सदस्य सूर्यकांत शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेच्या विध्यार्थिनींनी सुमधुर आवाजात इशस्तवन व स्वागत गीत गाऊन मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. या वेळी प्रशालेच्या वतीने मान्यवरनाचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष शरद शृंगारे यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीविषयी माहिती दिली. सावंत फौंडेशनचे सेक्रेटरी शरद सावंत यांनी सावंत फौंडेशनच्या विविध कार्यक्रमांची माहिती प्रेझेंटेशन सहित दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक माणिक पवार यांनी केले तर सूत्र संचलन सहा शिक्षक संतोष सांगळे यांनी केले.
डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र, विज्ञान केंद्र गोवा व चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ चेंदवण मुबंई यांच्या प्रयत्नातून हा आकाशदर्शन कार्यक्रम चेंदवण पंचक्रोशीतील शिक्षक, पालक, आणि विद्याथ्यांसाठी अगदी मोफत स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3.30 वाजता गोवा सायन्स सेंटरने आणलेल्या बस मधील २० विज्ञान प्रयोग दाखवून करण्यात आली. प्रथम शाळेच्या वीस मुलांना ते प्रयोग शिकविण्यात आले व त्यानंतर वीस वीस विद्यार्थ्यांचे गट करून प्रयोग समजावून सांगितले.
यावेळी उपस्थित असलेल्या नेहरु सायन्स सेंटरच्या शितल चोपडे यांनी व आयुकाचे प्रसाद आडेकर यांनी ग्रह ,तारे, सुर्यमाला, गँलेक्सी , चंद्र व शुक्राच्या कला, ग्रहांचे चंद्र, ग्रहण व इतर सखोल माहीती विद्यार्थी व पालकांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने दिली. तसेच तिथे आकाशदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आणलेल्या दुर्बीणी व अवकाश दर्शनासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर दुर्बीणींचीही माहीती सांगितली. नंतर आकाशातील ग्रह व तारे यांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडविण्यात आले. आकाशात अवलोकानासाठी उपलब्ध असणारा गुरु, इतर ग्रह सायंकाळ झाल्यानंतर सर्व उपस्थितांना मोठ्या दुर्बीणीने दाखविण्यात आला. त्यानंतर मंगळ व पहाटे पावणेपाच वाजता अवकाशात शुक्र ग्रह, शनी ग्रहाचे तसेच आकाशातील वेगवेगळ्या नक्षत्रसमुहाचे दर्शन सर्व विद्यार्थी व पालक व ग्रामस्थना करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या गोवा सायन्स सेंटरच्या प्रतिनिधीनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी 200 ते 300 विद्यार्थी व पालक , ग्रामस्थ , उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. एच पवार, प्रशालेचे शिक्षक उमेश धर्णे, संतोष सांगळे, शरद नाईक, उर्मिला गवस, विजय कांबळी, सिद्धी कांबळी, निलेश तवटे, कौशल पोयरेकर आदी शिक्षक व शाळेतील कर्मचारी वर्ग तसेच देवेंद्र नाईक, संजय नाईक, गोविंद भरडकर, कांबळी, आठलेकर, प्रमोद नाईक आदी पदाधिकारी, श्री जाधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळू मेस्त्री, नारायण शृंगारे, गौतम चेंदवणकर, सूर्यकांत शृंगारे, मिलिंद चव्हाण, सुचित साळसकर, सचिन फणसेकर,अथर्व शृंगारे , कौशल पोयरेकर, साईल बखले, रामचंद्र शृंगारे , संकल्प रेंवडकर, रोहित टुंबरे, वैष्णव मेस्त्री, अक्षता मेस्त्री, सौ परब, आदी आजी माजी विद्यार्थी इतर ग्रामस्थ, महिला यानी मदत केली. या सर्वांचे प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सदर उपक्रमाचे आभार प्रदर्शन उमेश धर्णे यांनी केले.
