माध्यमिक शिक्षक फेडरेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
*💫मालवण दि.२६-:* कोविडच्या कामासाठी खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना अधिग्रहित करू नये, अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या मार्च २०२० पासून राज्यातील माध्यमिक शाळांचे अध्ययन, अध्यापन कार्य विस्कळीत झालेले आहे. सध्या शाळां-शाळातून शैक्षणिक वर्ष अखेरची कामे, शालांत व अन्य परीक्षा विषयक कामकाज पूर्ण करणे विद्यार्थी हितासाठी आवश्यक आहे. शालांत परीक्षेच्या निमित्ताने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संपर्क येणार आहे. काही ठिकाणी कोविड सेंटरवर शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. म्हणून राज्य शासनाने कोविड १९ संबंधी कामासाठी कोणत्याही खाजगी अनुदानित माध्यमिक शाळामधील शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करू नये. त्यानुसार आपण सर्व स्थानीय प्राधिकारी जिल्हाधिकारी यांना उचित निर्देश तातडीने देण्यासंबंधी व्यक्तिगत लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाशी संलग्न असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने देखील ही मागणी लावून धरली आहे. संघाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पावसकर सेक्रेटरी पांडुरंग काळे, तानाजी पाटील, अजय शिंदे, माधव यादव, विजय मयेकर , संदीप शिंदे, गुरुनाथ पेडणेकर,उमेश सुकी, अच्युत वनवे, नारायण माने, शिवराम सावंत व जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे पदाधिकारी यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.
