वकिली क्षेत्रातील ‘दीपस्तंभ’ म्हणून गौरव:बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी घेतली दखल..
कुडाळ : मुंबई येथे पार पडलेल्या “रीजनल लॉयर्स कॉन्फरन्स – २०२५” मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने सिंधुदुर्गचे ज्येष्ठ वकील अॅड. राजीव दत्ताराम बिले यांना “सीनियर अॅडव्होकेट” म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रात त्यांच्या कायद्याच्या क्षेत्रातील अपार योगदानाची दखल घेण्यात आली असून, त्यांच्या प्रामाणिक कार्याला आणि ज्ञानाला मान्यता देण्यात आली आहे. “तुमची बारमधील उपस्थिती ही दीपस्तंभासारखी आहे” अशा शब्दांत कौतुक करत, अत्यंत प्रेरणादायी अश्या त्यांच्या कारकिर्दीचा विशेष गौरव करण्यात आला आहे.
शुक्रवारी १८ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कायदा व न्याय राज्यमंत्री अरुण राम मेघवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश, जस्टिस आलोक अराधे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याबरोबरच अतिरिक्त जस्टिस एम.एस. सोनाक (न्यायधीश- मुंबई उच्च न्यायालय ), जस्टिस ए. एस. गडकरी (न्यायधीश- मुंबई उच्च न्यायालय), जस्टिस एम. एस. कर्णिक (न्यायधीश- मुंबई उच्च न्यायालय), जस्टिस एस. सुंदरेशन (न्यायधीश- मुंबई उच्च न्यायालय Keynote speaker), मनन कुमार मिश्रा (अध्यक्ष- बार कौन्सिल ऑफ इंडिया व खासदार), अनिल सिंह (भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल), डॉ. बिरेंद्र सराफ( महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल) हे उपस्थित होते.
ॲड. राजीव बिले यांचा सन्मान जस्टिस एस. सुंदरेशन (न्यायधीश- मुंबई उच्च न्यायालय Keynote speaker) यांच्या हस्ते करण्यात आला. ॲड. बिले हे तब्बल ३८ वर्षे वकिली क्षेत्रात कार्यरत असून अनेक फौजदारी व दिवाणी प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. याशिवाय जिल्हा ग्राहक मंच,बाल न्यायालय,महसूल न्यायालय, येथे ते कार्यरत आहेत.
या कार्यक्रमाला ॲड. सुदीप पासबोला (अध्यक्ष- बीसीएमजी), ॲड. अहमदखान पठाण (उपाध्यक्ष- बीसीएमजी),ॲड.आशिष देशमुख (सदस्य- बार कौन्सिल ऑफ इंडिया), ॲड. संग्राम देसाई (माजी अध्यक्ष- बीसीएमजी), व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे इतर सदस्य उपस्थित होते. ऍड. राजीव बिले यांना मिलेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
