कणकवली: मुंबई येथून नातेवाईकाच्या विवाहासाठी कुडाळ तालुक्यातील भरणी येथे आलेल्या तरुणाचा आंघोळीसाठी गेला असताना दिगवळे गडनदीपात्रातील भाल कोंडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तो तरुण बुडाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला.मात्र, तो सापडला नव्हता. गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.
नरडवे येथील मूळ रहिवासी असलेला व सद्या मुंबई येथे राहत असलेला सूरज संजय शिंदे(२२) हा नातेवाईकाच्या लग्नासाठी भरणी येथे आला होता. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्यासह चौघेजण दिगवळे बामणदेववाडी येथील गडनदी पात्रातीलi भालकोंडीत आंघोळीसाठी गेले होते.नदीपात्रात डुंबत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सूरज शिंदे हा अचानक बुडाला. त्याच्या सोबत असलेल्या तिघांनी आरडाओरडा केला. तसेच या घटनेबाबतची माहिती नातेवाईकाना दिली.तर भरणी सुंदरवाडी येथील अनिकेत गणपत मेस्त्री याने पोलिसांना या घटनेबाबत सांगितले.
कनेडी पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार मिलिंद देसाई व पोलिस नाईक राहुल राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या सहाय्याने सूरज याचा पाण्यात शोध घेण्यात आला.मात्र, रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सूरज याचा मृतदेह आढळून आला.
या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.सूरज याच्या पश्चात आई आहे. .
दिगवळे येथे नदीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू…
