देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून महिलेची दोन मुलांसह आत्महत्या : परिसर हादरला…

देवगड, दि. १६ एप्रिल : देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

श्रिया सुरज भाबल (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या तिर्लोट-आंबेरी येथील रहिवासी होत्या. त्यांचे पती सुरज भाबल हे मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. श्रिया आपल्या सासू-सासऱ्यांसोबत पिरलोट-आंबेरी येथे राहत होती.

१५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता श्रिया आपल्या दोन मुलांना श्रेयस (वय ५) आणि दुर्वेश (वय ४) यांच्यासह घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली.

१६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास श्रिया यांचा मृतदेह आंबेरी पुलाजवळ आढळून आला. तर श्रेयस या पाच वर्षीय मुलाचा मृतदेह पिराचे पोय या ठिकाणी सापडला. मात्र दुर्वेश हा चार वर्षीय बालक अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरु आहे.

श्रिया यांनी दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. श्रिया यांचे माहेर कर्नाटक राज्यात आहे.

या प्रकरणी पुढील तपास संबंधित पोलीस विभाग करीत आहेत.

You cannot copy content of this page