मालवण (प्रतिनिधी)
मालवणच्या सागरातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५८ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा पूजन, सागर पूजन व सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांचे पूजन करण्यात आले. तसेच शिवप्रार्थना म्हणत, मर्दानी खेळ सादर करत आणि शिवरायांचा जयघोष करत शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची ज्याठिकाणी पायाभरणी केली अशा मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळी प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्ष आणि इतिहास अभ्यासक डॉ. ज्योती तोरसकर यांच्या हस्ते सकाळी गणेश पूजन व सागर पूजन करण्यात आले. रविकिरण आपटे यांच्या पौरोहित्याखाली ही पूजा संपन्न झाली. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना होत प्रथम श्री हनुमानाची पूजा अर्चा केल्यावर शिवराजेश्वर मंदिरात श्रीराम सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर शिवप्रार्थना म्हणून घोषणा देत शिवरायांचा जयजयकार करण्यात आला.
यावेळी डॉ. ज्योती तोरसकर यांनी उपस्थितांना सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाविषयी माहिती दिली. सिंधुदुर्ग किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या सिंधुदुर्ग ऍडव्हेन्चर, शिवप्रेमी सिंधुदुर्ग, सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग मावळा प्रतिष्ठान या संस्थांचा प्रेरणोत्सव समितीतर्फे शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर कोल्हापूर येथील न्यू छत्रपती ब्रिगेडच्या सदस्यांनी थरारक असे मर्दानी खेळ सादर करत शिवरायांना मानवंदना दिली.
यावेळी प्रेरणोत्सव समितीचे सचिव विजय केनवडेकर, सहसचिव गणेश कुशे, खजिनदार हेमंत वालकर, सदस्य भाऊ सामंत, प्रा. रामचंद्र काटकर, प्रदीप वेंगुर्लेकर, रविकिरण तोरसकर, दत्तात्रय नेरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, रवींद्र तळाशीलकर, सूर्यकांत फणसेकर, उमेश मांजरेकर, रत्नाकर कोळंबकर, विजय चौकेकर, ललितकुमार वराडकर, श्रीराज बादेकर, संदीप बोडवे, प्रा. डॉ. एम. आर. खोत, अनिल न्हीवेकर, अर्जुन मांजरेकर, निखिल नेरकर, बाबू जोशी, कमलेश चव्हाण, सुनील परुळेकर, अनिकेत चव्हाण, माधवी तिरोडकर, कॅनरा बँकेचे मालवण शाखा व्यवस्थापक तौफिक वलांडकर, विशाल मालवणकर, अर्णव मयेकर, स्वराज बांदकर, काव्या सरकारे, नील सांगवेकर आदी तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनसीसी विद्यार्थी, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या दि. १३ एप्रिल रोजी दुपारी ३. ३० वाजता राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन शिवराजेश्वर मंदिरात पूजन करणार असून त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर सायंकाळी ५ वाजता ‘रणरागिणी ताराराणी’ हे नाटक मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत सादर होणार आहे, अशी माहिती किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे देण्यात आली.