⚡मालवण ता.२९-:
मालवण येथील स का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात जिमखाना विभागांतर्गत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सचिव गणेश कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकुर जिमखानाप्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, सेक्रेटरी प्रा. के. के. राबते, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी मनाली पालव व श्रावणी गावडे उपस्थित होत्या.
प्रथ म मुंबई विद्यापीठस्तरावर, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाल्याबद्दल अनुष्का आंबेरकर, प्रथमेश चोपडेकर, हर्षदा पवार, राहुल चव्हाण, रिद्धी हडकर यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाद्वारे घेण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवात यश मिळविलेल्या १०० विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यात बुद्धिबळ, कॅरम, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, रस्सीखेच, क्रिकेट या खेळांचा समावेश होता. मुंबई विद्यापीठस्तरावर प्रथमेश चोपडेकरने झोन ४ च्या टीममध्ये सहभागी होऊन ब्राँझ पदक मिळविले. अनुष्का आंबेरकरची निवड मुंबई विद्यापीठाच्या क्रिकेट संघात झाली होती. हा संघ राष्ट्रीयस्तरावर खेळला. रिद्धी हडकरची निवड मुंबई विद्यापीठाच्या कबड्डी संघात झाली होती. जयपूर येथे झालेल्या अश्वमेध स्पर्धेत तिची निवड झाली. हर्षदा पवारची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत निवड झाली. राहुल चव्हाणची दिल्ली परेडसाठी निवड झाली, या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
२०२३-२४ या शेक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध ६० पारितोषिके देण्यात आली. यामध्ये बीकॉम परीक्षेत प्रथम सिल्व्ही डान्टस, बीए परीक्षेत प्रणाली बांदेकर, मराठी विषयात हर्षाली कांदळगावकर, हिंदी भूगोलमध्ये उत्कर्षा मालंडकर, बीएससीमध्ये अभिषेक एस. एस., सर्वांगीण नैपुण्याबद्दल मेहेक शेख, जिमखाना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मिथुन मानवर व स्पर्धातील अन्य विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
गणेश कुशे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच गेल्या काही वर्षांमध्ये कॉलेजचा चढता आलेख पाहता, महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकुर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यात आणखी सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही दिली. संस्था कार्याध्यक्ष श्री. पंतवालावलकर यांनी गेल्या १० वर्षांत महाविद्यालयाची मोठी प्रगती झाली, असे सांगून भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन प्राः प्रमोद खरात यांनी केले. प्रास्ताविक डॉ हंबीरराव चौगले यांनी केले आभार प्रा. के. के. राबते यांनी मानले.
