⚡सावंतवाडी ता.२८-: आंबोली येथील संरक्षित वनक्षेत्रात जंगली सशाची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार संशयित आरोपींना आज न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.याकामी अँड. परिमल नाईक यांनी काम पाहिले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी २६ मार्च २०२५ रोजी रात्री हत्तींपासून संरक्षणासाठी गस्त घालत असताना माडखोल येथील दशरथ राऊळ आणि कुडाळ येथील प्रशांत कुबल यांना संशयास्पद स्थितीत मोटारसायकल (क्रमांक एम एच/०७ १४६१) घेऊन जाताना थांबवले. तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून मृत जंगली ससा आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या दरम्यान, माडखोल येथील सखाराम राऊळ आणि चौकूळ येथील अमोल गावडे यांचाही या शिकार प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. वनविभागाने या चारही आरोपींविरुद्ध वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९, ५०, ५१, ५२ आणि वन कायदा कलम २६(४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. आज या आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायदंडाधिकारी (प्र. व.) श्रीमती मिस्त्री यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी दशरथ राऊळ, प्रशांत कुबल, सखाराम राऊळ आणि अमोल गावडे यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. संशयित आरोपींच्या वतीने अॅड. परिमल नाईक, अॅड. सुशील राजगे, अॅड. रश्मी नाईक, अॅड. अमिषा बांदेकर आणि अॅड. पल्लवी शिंदे यांनी कामकाज पाहिले.
