शशिकांत तांबे प्रथम, श्रुती राऊळ व तनया सावंत द्वितीय तर श्रेयश शिंदे यांनी पटकावला तृतीय क्रमांक..
⚡सिंधुदुर्ग दि.१५-: ‘एल एम नाईक स्मृती प्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ ने सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या पत्र लेखन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून सदर पत्रलेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शशिकांत तांबे (फोंडाघाट), द्वितीय क्रमांक (विभागून) तनया पाटील (सावंतवाडी) व श्रुती राऊळ (सावंतवाडी) तर श्रेयश शिंदे (कळसुली) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका येथील पल्लवी शिंदे-माने आणि ओरोस येथील आर्या बागवे यांचा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. प्रसिद्ध सिनेकलाकार वेतोबा मालिका फेम अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. लेखक व साहित्यिक संजय तांबे यांजकडून दिवंगत आई-वडील सुनंदा व शिवाजी तांबे यांच्या स्मरणार्थ प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आले होते. यावेळी लेखक संजय तांबे, संस्थेच्या अध्यक्षा गितांजली नाईक, सचिव सचिन कोर्लेकर, खजिनदार गौरेश नाईक, लतिका नाईक, वर्षा तळेकर, अपूर्वा गोलतकर, दिपाली नाईक, सुगंधा देवरुखकर, निकेत पावस्कर, हेमंत पाटकर, राजेंद्रप्रसाद मणेरीकर, सतीश कदम, राधिका तांबोळकर, ज्योती रावराणे, दर्शना पाताडे, तनया पाटील, उल्का कवठेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सादच्या अध्यक्षा गितांजली नाईक या प्रास्ताविक मांडताना म्हणाल्या की वडील एल एम नाईक यांच्या स्मृती जपण्यासाठी साद फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजेचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पत्रलेखन स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षीच्या देशप्रेमावरच्या शहीद जवानाबद्दलच्या विषयाला देश विदेशातून भरघोस असा प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या सिनेकलाकार अक्षता कांबळी म्हणाल्या की, साद चे काम पाहून मी खूप आनंदी झाले असून साद चे उपक्रम हे उल्लेखनीय आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सादचे सचिव सचिन कोर्लेकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने, जिल्हा किंवा भारत देशच नव्हे तर जगभरातील मानसिकता बदलण्याचे काम साद च्या पत्रलेखन स्पर्धेने केले आहे. साद फाउंडेशन नावाची ही संस्था केवळ नावासाठी काम करत नसून समाजाची गरज म्हणून ओळखली जाऊ लागली असल्याचे सांगितले. उपस्थित स्पर्धकांनी शहीद जवानांबद्दलच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सोशल मीडिया किंवा व्हाट्सअप इन्स्टाच्या जमान्यात साद सारखी संस्था पत्र लेखन स्पर्धा राबवून आम्हाला पत्र लिहायला भाग पाडते, त्याबद्दल आभार व्यक्त केले तर पत्रलेखनात प्रसिद्ध असलेले निकेत पावस्कर यांनी यावेळी सांगितले, की मला देश विदेशातून जे कोणी संदेश पाठवणारे असतात त्यांना मी आजही मेल किंवा व्हाट्सअपवर पत्र न पाठवता टपाल पेटीद्वारेच तुमचे अभिप्राय कळवा असे आवर्जून सांगतो. निवड झालेल्या स्पर्धकांनी पत्रलेखनांचे उत्तम सादरीकरणही केले. उपस्थित मान्यवर आणि लेखकांनी मनोगते सादर केली. संस्थेच्या वतीने अध्यक्षा गितांजली नाईक आणि सचिव सचिन कोर्लेकर निवड झालेल्या स्पर्धकांसह सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा गितांजली नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी दिपाली नाईक व आभार प्रा. अपूर्वा गोलतकर यांनी मानले. या प्रसंगी साद फाउंडेशनच्या उल्लेखनीय कार्याला आर्थिक योगदानाची गरज असल्याचे सांगून लेखक व साहित्यिक संजय तांबे यांनी रोख रुपये 10000/- आर्थिक योगदान केले. त्याबद्दल संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार गौरेश नाईक आणि सदस्या प्रसिद्ध उद्योजिका वर्षा तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
