*💫सावंतवाडी दि.२८-:* बेळगाव येथे आनंद अकॅडमी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाने सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाची स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फर्स्ट क्रिकेट अकॅडमी या संघाशी गाठ पडली. नाणेफेक जिंकुन सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आर्यन २५ , सुजल ३० आणि मिहिर १२ यांच्या फलंदाजीच्या जोरावर २५ षटकात सर्वबाद १४० धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना फर्स्ट क्रिकेट अकॅडमी संघाचा डाव १९.५ षटकात अवघ्या ८२ धावात आटोपला. सावंतवाडी संघ ५८ धावांनी विजयी झाला..गोलंदाजीत उस्मा व आरव यांनी प्रत्येकी २ तर पराग , आर्यन, भगवान आणि मानस या गोलंदाजांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. स्पर्धेतील दुसऱ्या आणि उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात सावंतवाडी संघाची गाठ अर्जुन स्पोर्टस युनियन जिमखाना या संघाशी पडली. सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्वीकारली व मिहिर कुडाळकर नाबाद ३०, ईशान कुबडे ३४ , आरोह मल्होत्रा १५ आणि मानस कोरगावकर नाबाद १४ यांच्या फलंदाजीच्या जोरावर मर्यादित २५ षटकात ५ गडी बाद १३९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जुन स्पोर्टसने निकराची झुंज दिली.. सावंतवाडी संघाने त्यांना २५ षटकात ५ गडी बाद १३५ धावसंख्येवर रोखल आणि या रंगतदार सामन्यात विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सावंतवाडी संघातर्फे मिहिरने आणि आर्यन कुडाळकर व गौरांग बिडये यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या मिहीर कुडाळकरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आल. सांवतवाडी संघाच्या या यशाच श्रेय खेळाडुंवर मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षक राहुल रेगें बरोबर या संघातील सर्व खेळाडुंच्या पालकांना जात. कारण कोरोना संसर्गाच्या काळात सुद्धा त्यांनी आपल्या मुलांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक योगदान दिल.
बेळगाव येथील क्रिकेट स्पर्धेत एम्स ॲकॅडमी सावंतवाडी उपांत्य फेरीत दाखल
