*भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी स्वघोषित नेत्यांना सुनावले*
*💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेले सर्वच निर्णय हे जनहिताचेच असून, विरोधक दिशाभूल करत असल्याची टीका सावंतवाडी भाजप मंडळ शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सावंतवाडीतील अनधिकृत स्टॉल बाबत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करत त्यांच्या पाठीशी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरपालिकेने काढलेला अनधिकृत स्टॉल पुन्हा उभरल्याच्या कृत्याचा भाजप कडून निषेध देखील त्यांनी व्यक्त केला आहे. काही समाज विघातक घटकांना बरोबर घेऊन नगरपालिकेसमोर ढोल वाजवून शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी नौटंकी करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच आमदार दिपक केसरकर हे नगराध्यक्ष असताना भांगले पेट्रोल पंप समोरील खाऊ गल्ली उध्वस्त करत स्थानिक लोकांना बेरोजगार करण्यात आले त्यावेळी नगरसेविका लोबो गप्प का होत्या असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी आणि इतर पक्षीय कार्यकर्ते अनधिकृत गाळ्याचे समर्थन करून समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. तसेच नगराध्यक्ष संजू परब आणि नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यंनी प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन केलेली कामे सावंतवाडीकराना माहिती असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.