मातोंड येथे सत्कार प्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे प्रतिपादन..
⚡वेंगुर्ले ता.१७-:
सिंधुदुर्गात अनेक नेते झाले. बॅ. नाथ पै पासून मधु दंडवते आणि दंडवते साहेबांपासून सुरेश प्रभू पर्यंत तसेच नारायणराव राणे साहेबांसारखे ज्येष्ठ नेते आहेत. सर्वांच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत. पण सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा विचार केला. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे राजकीय हेवेदावे काही असले तरी माणसाला माणूस धावून येतो. ही राजकीय सभ्यता या जिल्ह्यात दिसून येते. असे मात्र महाराष्ट्रात कुठेही दिसून येत नाही. म्हणून हे संस्कार आणि ही सभ्यता जिल्हा कायम ठेवेल अशी मनोकामना व्यक्त करतो असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मातोंड येथे बोलताना व्यक्त केले.
विधानसभेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात आलेल्या आम. राहुल नार्वेकर यांनी मातोंड येथील श्रीदेवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, देवस्थान समिती अध्यक्ष हिरोजी उर्फ दादा परब, मानकरी उदय परब, रविकिरण परब, तुकाराम परब, दिगंबर परब, दादा म्हालटकर, सुधाकर परब, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच
आनंद परब, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार ओंकार ओतारी व अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सलग दुसऱ्या वेळी विधानसभेचे अध्यक्ष पद मिळाल्याबद्दल राहुल नार्वेकर यांचा मातोंड गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
